अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार
‘सन्मान तिच्या कर्तृत्वाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सर्वांचे घर असावे, सर्वा मुखी असावा घास, राहू नये कधी कुणी उपाशी हा एकाच वसा हा एकाच ध्यास… समाजात माणुसकीची जाणीव ठेवत, निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी ‘अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन’ तर्फे त्यांच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त एक आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘सन्मान तिच्या कर्तृत्वाचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ११ ऑगस्ट २०२५, सोमवार रोजी दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे होणार आहे.
या कार्यक्रमात सामाजिक भान जपत कार्य करणाऱ्या उल्लेखनीय महिलांचा गौरव करण्यात येणार असून, एक प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि गणेश वंदनेने होणार असून, त्यानंतर संस्थेची कार्यदिशा, उद्दिष्टे आणि संस्थापकांचा थोडक्यात परिचय सादर केला जाईल. यानंतर “बाईपण भारी देवा” या संगीतमय आणि भावस्पर्शी अभिवाचनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
कार्यक्रमात समाजासाठी समर्पित योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मंगळागौरी स्पर्धासुद्धा रंगणार आहे. ही पारंपरिक स्पर्धा उपस्थितांसाठी एक आनंदाचा अनुभव ठरणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या या सोहळ्याला आपली उपस्थिती हीच आयोजकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जर आपण अथवा आपल्याजवळील एखाद्या महिलेनं समाजासाठी उल्लेखनीय कार्य केलं असेल, तर त्यांचं नाव आणि थोडक्यात परिचय ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत WhatsApp क्रमांक 9175775251 वर पाठवावा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रज्ञा प्रफुल्ल पितळे – 7887555251.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका प्रज्ञा प्रफुल्ल पितळे (अध्यक्षा) आणि संजना प्रफुल्ल पितळे (उपाध्यक्षा) यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्त्री सामर्थ्याचा सन्मान, समाजसेवेचा गौरव आणि श्रावणातील सांस्कृतिक उत्सव यांचा अनोखा संगम म्हणजे हा कार्यक्रम ठरणार आहे.