पथनाट्याच्या माध्यमातून मानवी तस्करीविरोधात जनजागृती – वालिया महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मानवी तस्करीच्या धोक्याविरोधात समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने, कॉसमोटोपोलीयन एज्युकेशन सोसायटीच्या वालिया महाविद्यालय आणि प्रकृती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय पथनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्या डॉ. बागेश्री बांदेकर म्हणाल्या, “मानवी तस्करी थांबवणे हे कोण्या एका व्यक्तीचे काम नाही, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.” तसेच, प्रकृती संस्थेच्या ‘यंग इंडिया अनचेंज्ड’ उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरविंद पांचाळ यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. त्यांच्यातील संवेदनशीलता वाढीस लागते आणि अशा समस्या रोखण्यासाठी सक्षम पिढी घडते.” तसेच कॉसमोटोपोलीयन एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजित बालन यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “अशा शिबिरांतून घडणारे स्वयंसेवक समाजकार्याच्या प्रवाहात पुढे येतात आणि परिवर्तनाच्या दिशेने ठोस पावले उचलतात.”
या कार्यशाळेतील प्रमुख पथनाट्य मार्गदर्शक म्हणून सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) येथील मराठी विभागप्रमुख आदरणीय प्रा. जगदीश संसारे यांनी विद्यार्थ्यांना पथनाट्य सादरीकरणाचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रात्यक्षिके, संप्रेषण कौशल्य, शारीरिक अभिव्यक्ती व नाट्यकला यावर आधारित सत्रे घेतली. त्यांना सहाय्यक पथनाट्य प्रशिक्षक माधवी पवार यांनी मार्गदर्शनासाठी मोलाची साथ दिली.
प्रशिक्षणार्थींनी केवळ अवघ्या अर्ध्या तासाच्या सरावानंतर सादर केलेली सहा पथनाट्ये त्यांच्या कल्पकतेचे आणि सजगतेचे प्रभावी दर्शन घडवत होती. ज्यातून मानवी तस्करीविरोधातील सजगतेचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अतिशय समर्पितपणे काम पाहिले. समारोप प्रसंगी वालिया महाविद्यालयाच्या एन.एस.एस. जनरल सेक्रेटरी सदिच्छा कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक व शिबिरार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
#mumbai #News Alart #Headline