“छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करा” – डॉ. कविता आल्मेडा
विरार (गुरुदत्त वाकदेकर) : ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा येथे, आय क्यू ए सी अंतर्गत मराठी विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ११ ऑगस्ट २०२५ रोजी “किल्ल्यांची बाराखडी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा प्रमुख उद्देश या कार्यक्रमाचा होता.
सदर प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. कविता आल्मेडा यांनी उपस्थितांना प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. आपण प्रत्येकाने त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मार्गक्रमण करायला हवे.”
इतिहास विभाग प्रमुख डॉ. विन्सेंट डिमेलो यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास रसपूर्ण पद्धतीने, जिवंत चित्रणासह विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला. यानंतर एस. वाय. बी. ए. वर्गातील शिव व्याख्याती साक्षी मोरे हिने पीपीटीच्या माध्यमातून युनेस्को मान्यता प्राप्त १२ किल्ल्यांचा परिचय उपस्थित शिवप्रेमी विद्यार्थ्यांना करून दिला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक किल्ल्यांबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली. सभागृहात इतिहासाविषयी अभिमान आणि प्रेरणेची भावना ओसंडून वाहत होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख जगदीश अनंत संसारे यांनी उत्साहपूर्ण शैलीत केले, तर मंथन कदम या विद्यार्थ्याने कृतज्ञतापूर्वक सर्वांचे आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या इतिहासावरील प्रेमाला आणि शिवकालीन वारसा जपण्याच्या प्रेरणेला नवीन उभारी देणारा ठरला.