गुहागरची आमसभा ९ सप्टेंबरला
विकासकामातील अडथळे सोडविण्यासाठी नागरिकांना आवाहन
गुहागर (प्रतिनिधी) – पंचायत समिती गुहागरची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची आमसभा ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी श्री. पूजा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आली आहे. आमसभेचे अध्यक्षस्थान आमदार भास्कर जाधव भूषवणार असून, तालुकावासीयांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी गुहागर यांनी केले आहे.
पंचायत समितीची आमसभा म्हणजे गावागावांतील प्रलंबित विकासकामांमधील अडथळे सोडविण्याचा महत्त्वाचा मार्ग असतो. या बैठकीत शासनाच्या विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित राहतात आणि नागरिकांनी दिलेल्या निवेदनांना उत्तर देतात. आमदारांच्या अध्यक्षतेमुळे अधिकाऱ्यांना ठोस व जबाबदार उत्तरं देण्यास प्राधान्य मिळते. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते.
नागरिकांनी आपल्या तक्रारी किंवा मागण्या लेखी स्वरूपात पंचायत समिती कार्यालयात २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५ प्रतीत सादर कराव्यात. तसेच बैठकीच्या दिवशीही थेट प्रश्न उपस्थित करता येतील, असे आमसभा सचिव तथा गटविकास अधिकारी शेखर शा. भिलारे यांनी सांगितले.
#गुहागर #आमसभा #भास्करजाधव #पंचायतसमिती #कोकणविकास