व्यवस्थापन कौशल्यांचा अनोखा धडा – मुंबईत आगळ्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

व्यवस्थापन कौशल्यांचा अनोखा धडा – मुंबईत आगळ्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईत प्रथमच नाटक, मालिका, चित्रपट आणि इव्हेंट्स व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. यशवंत नाट्य मंदिर संकुल (सी हॉल), जे. के. सावंत रोड, माटुंगा येथे झालेल्या या कार्यशाळेला नवोदितांसह क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

कार्यशाळेचे आयोजन व्हिजनचे श्रीनिवास नार्वेकर आणि पॅसिफिक ओशियन प्रॉडक्शनचे प्रसाद सावर्डेकर यांनी केले. सहाय्यक संयोजक म्हणून तेजस्विनी जोईल, अनिश म्हेसळकर आणि लव क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत दिलीप जाधव, विवेक वैद्य, राकेश तळगांवकर, वैभव पवार, देवेंद्र पेम, विजय गोखले आणि अनिल गवस यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यशाळेत व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “पिन टू कार्पेट” ही संकल्पना आत्मसात करण्याची गरज स्पष्ट केली गेली. आजच्या काळात मोठ्या नाट्य-महोत्सवांसोबतच वाढदिवस, लग्नसमारंभ, बारसे, मुंज, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार सोहळे आणि कॉर्पोरेट इव्हेंट्स अशा छोट्या-मोठ्या सर्व कार्यक्रमांमध्ये व्यवस्थापनाची व्याप्ती झपाट्याने वाढली आहे.

कार्यशाळेची संकल्पना पॅसिफिक ओशियन प्रॉडक्शनचे प्रसाद सावर्डेकर यांनी मांडली. ते स्वतः अनुभवी मालिका व्यवस्थापक असून प्रत्यक्ष कामात जाणवलेल्या अनुभवांमुळे अशा कार्यशाळेची गरज वाटली. उद्घाटनावेळी ‘ऑल दी बेस्ट’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम विद्यार्थी म्हणून सहभागी झाले.

 

दिवसभरात अभिनेते विजय गोखले आणि अनिल गवस यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहन दिले. दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत विविध दिग्गज व्याख्याते मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव, ‘स्वाभिमान’ आणि ‘काव्यांजली’ मालिकांचे कार्यकारी निर्माते विवेक वैद्य, नाट्य-एकांकिका स्पर्धा व सरकारी पुरस्कार सोहळ्यांचे व्यवस्थापक राकेश तळगांवकर, तसेच इव्हेंट टेक सोल्युशन्स अँड मार्केटिंग मॅनेजमेंटचे संचालक वैभव पवार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

 

संध्याकाळी झालेल्या समारोप व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक व अभिनेते अजित भुरे उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “आपल्याकडे कार्यकर्ते वाढले पाहिजेत. त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले पाहिजे. म्हणूनच व्यवस्थापन कार्यशाळा घेणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांनी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले.

 

प्रशिक्षणार्थ्यांनीही समाधान व्यक्त केले. निलेश पाळेकर म्हणाले, “निर्मितीच्या क्षेत्रात नवख्यांना उभे राहण्यासाठी खोलवर मार्गदर्शन मिळाले.” राजेश मौर्य यांनी नमूद केले, “नार्वेकर सर, सावर्डेकर दांपत्य आणि टीमचे आयोजन अत्युत्तम होते.” सचिन चव्हाण म्हणाले, “योग्य वेळेत सुरू आणि संपलेला कार्यक्रम, तसेच दिग्गजांचे मार्गदर्शन, हे अनुभव अनमोल आहेत. पुढील उपक्रमांत सहभागी होण्याची मला आवड आहे.”

 

मुंबईत प्रथमच झालेली ही नाटक-मालिका-चित्रपट-इव्हेंट्स व्यवस्थापन कार्यशाळा सर्वार्थाने यशस्वी ठरली. प्रभावी नियोजन, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि आयोजकांची मेहनत यामुळे सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. सर्वांच्या अभिप्रायातून या कार्यशाळेची गरज आणि उपयुक्तता अधोरेखित झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...