🔴 प्रशांत यादव भाजपमध्ये; “स्वार्थी राजकारण व चौकशी थांबवण्यासाठी प्रवेश” – छोट्या गवाणकर
सहा महिन्यांत विचार बदलले; संगमेश्वरातील मतदारांचा अपमान – परखड टीका
देवरुख (वार्ताहर) –
संगमेश्वरातील तीन पक्षांची फेरफटका मारून अखेर भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रशांत यादव यांच्यावर उबाठा नेते व माजी सभापती छोट्या गवाणकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “यादवांचा उद्देश फक्त स्वतःचा विकास आणि चिपळूण नागरी पतसंस्थेवरील चौकशी थांबवणे एवढाच असून, मतदारांनी त्यांचा विश्वासघात ओळखला आहे,” अशी परखड भूमिका गवाणकर यांनी घेतली.
🗣️ “नव्वद टक्के मते घेऊनही आमचा अपमान केला”
गवाणकर म्हणाले, “संगमेश्वरातील मतदारांनी प्रशांत यादव यांना नव्वद टक्के मते दिली. एवढं मोठं जनमत मिळूनही त्यांनी त्याचा अनादर केला आहे. योग्य वेळी मतदार त्यांना जागा दाखवतील.”
🗣️ “विचारांची फसवणूक – सरड्यालाही मागे टाकले”
गेल्या निवडणुकीत “ही विचारांची लढाई आहे” म्हणत शरद पवारांचे नाव घेऊन मतदारांना गोंजारणारे यादव सहा महिन्यांतच भाजपात गेले. “राणेंच्या निवडणुकीत भाजपला जातीयवादी म्हणणारेच आज त्याच पक्षात गेले आहेत. राजकारणात रंग बदलण्याची कला असेल तर प्रशांत यादव त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी तर सरड्यालाही मागे टाकले,” असा घणाघात गवाणकर यांनी केला.
🗣️ “चौकशीपासून वाचण्यासाठी भाजप प्रवेश”
“यादवांचा भाजप प्रवेश हा विकासासाठी नसून चिपळूण नागरी पतसंस्थेची चौकशी थांबवण्यासाठी व स्वतःचा विकास करण्यासाठी आहे,” असा आरोप गवाणकर यांनी केला. “योग्य वेळी मतदार त्यांना धडा शिकवतील. आम्ही तर अशा संधीची वाटच पाहत आहोत,” असेही ते म्हणाले.
🗣️ “खरा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत”
“आमच्यातून कोणी गेले तरी फरक नाही. खरा शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच आहे. येत्या काळात आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. मात्र प्रशांत यादव यांनी आमदारकीची स्वप्ने पाहणे बंद करावे,” असा सल्ला गवाणकर यांनी दिला.
—
🔖 हॅशटॅग्स :
#प्रशांतयादव #भाजप #शिवसेना #संगमेश्वर #चिपळूणपतसंस्था #छोट्यागवाणकर #RatnagiriPolitics
📸 फोटो