लोकमान्यांच्या गणेशोत्सवाची मूळ संकल्पना कुठे हरवली?
“आरास नव्हे, तर जागृती; गोंगाट नव्हे, तर विचारांची ज्योत; हीच टिळकांच्या गणेशोत्सवाची खरी ओळख होती.”
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी उभारलेला सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर तो एक सामाजिक आणि राजकीय क्रांतीचा दीपस्तंभ होता. गणपती हा घराघरातील भक्तीचा देव; परंतु टिळकांनी त्याला सार्वजनिक पातळीवर आणून समाजाच्या हृदयात एकता, ऐक्य आणि जागृतीचा दिवा प्रज्वलित केला. त्या उत्सवाच्या गजरात देशभक्तीचे गीत झंकारले, तरुणांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली आणि गुलामगिरीतल्या भारताला स्वातंत्र्याचा श्वास जाणवला.
तो गणेशोत्सव म्हणजे विचारमंथनाचे व्यासपीठ, जनतेच्या वेदना मांडण्याचे साधन, समाजातील जातीभेदावर फुंकर घालणारा शुद्ध आत्मभाव. देवाच्या पायरीवर सारे समान — हा संदेश समाजाच्या प्रत्येक शिरेशिरेत भिनवण्याची ताकद या उत्सवात होती. त्यातून केवळ पूजाअर्चा नव्हे, तर व्याख्याने, नाटके, कीर्तनं, देशभक्तीपर गीतांद्वारे स्वराज्याचा मंत्र जनतेला मिळत होता. हेच टिळकांचे स्वप्न होते — गणरायाच्या मंडपातून स्वराज्याचा गजर व्हावा.
मात्र काळाच्या ओघात या संकल्पनेचे रूपांतर झाले आणि जे परिवर्तनाचे व्यासपीठ होते ते हळूहळू प्रदर्शनाच्या झगमगाटात हरवले. आजचे चित्र वेगळेच दिसते. प्रचंड अवाढव्य मूर्ती, महागड्या सजावट, डीजेच्या कर्णकर्कश आवाजात हरवलेले भजन, गर्दीत विसरलेली भक्ती, राजकीय नेत्यांच्या छायेत झाकोळलेली समाजजागृती आणि व्यावसायिकतेच्या नफ्यात गिळंकृत झालेले सांस्कृतिक मूल्य — ही वस्तुस्थिती आहे. श्रद्धा ही जिव्हाळ्याची भावना राहिली नाही, तर ती दिखाव्याच्या धामधुमीत दडपून गेली. पर्यावरणाचा ऱ्हास, नदी-तलावांचे प्रदूषण, आवाजाचा त्रास आणि वाहतुकीची कोंडी — या सर्व विसंगतींनी लोकमान्यांच्या संकल्पनेवर जणू काळा धूरच फासला.
आज प्रश्न उभा राहतो — टिळकांच्या संकल्पनेला सुरुंग कोणी लावला? केवळ राजकारण्यांनी का? केवळ व्यावसायिकांनी का? की आपण सर्वांनी मिळून या संकल्पनेचे अध:पतन घडवून आणले? कारण उत्सवाच्या माध्यमातून समाजजागृती घडवण्याऐवजी आपण त्याला नुसता सोहळा, नुसती दिखाऊ स्पर्धा, नुसता कोलाहल बनवून टाकला आहे. आपण विसरलो की, गणेशोत्सव हा फक्त दहा दिवसांचा गडबडीचा कल्लोळ नव्हे, तर तो एक प्रेरणा आहे — समाजाला बांधणारी, एकत्र आणणारी, न्याय-अन्यायाचा विचार करणारी.
आजच्या काळात माध्यमांचा व समाजमाध्यमांचा प्रभावही प्रचंड आहे. थेट प्रक्षेपण, लाईव्ह अपडेट्स, स्पर्धात्मक मंडळांच्या जाहिराती — यातून भक्तीचे नव्हे, तर स्पर्धेचे प्रदर्शन घडते. यातून मूळ उद्देश झाकोळला जातो. मात्र माध्यमांची ही ताकद सकारात्मकतेसाठी वापरली तर? पर्यावरणपूरक मूर्तींचा प्रचार, सामाजिक उपक्रमांचे कौतुक, आणि उत्तम कार्याची प्रेरणा — हे सर्व समाजाला नवी दिशा देऊ शकते.
मात्र अजूनही सर्व काही हरवलेले नाही. अनेक मंडळे आजही रक्तदान, आरोग्य शिबिरे, शालेय मदत, पर्यावरणपूरक मूर्ती या मार्गाने समाजकारणाची वाट धरताना दिसतात. हे चित्र आशेचा किरण दाखवते. आपली जबाबदारी आहे की हा किरण अधिक तेजोमय करावा. आपणच ठरवायचे आहे की गणेशोत्सव हा समाजजागृतीचा दीपस्तंभ राहील की गोंगाटात हरवलेली सामाजिक जत्रा?
लोकमान्यांनी दिलेली प्रेरणा आपल्याला पुन्हा जागवावी लागेल. गणेशोत्सव हा विचारांचा उत्सव बनवावा लागेल. मूर्ती मातीची असावी, पण आपले विचार लोखंडासारखे कठीण असावेत. सजावट साधी असावी, पण अंत:करणातील श्रद्धा झगमगावी. गजर जोराचा असावा, पण तो समाजजागृतीचा असावा. टिळकांच्या संकल्पनेला पुन्हा तेजस्वी करणे ही आपली जबाबदारी आहे, कारण गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही — तो आपल्या राष्ट्रीय अस्तित्वाचा, आपल्या सांस्कृतिक ओळखीचा, आणि आपल्या सामाजिक जबाबदारीचं अधिष्ठान आहे.
लोकमान्यांनी प्रज्वलित केलेला हा दीप आजही विझलेला नाही, फक्त त्याभोवती धुरकटलेली अवनतीची सावली आहे. आपणच ती झाडून टाकली पाहिजे. गणेशोत्सवाला पुन्हा समाजजागृतीचे, ऐक्याचे, संस्कृतीरक्षणाचे व्यासपीठ बनवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. गणरायाच्या साक्षीने आपण स्वतःला प्रश्न विचारू या — आपण या उत्सवाला खऱ्या अर्थाने पवित्र ठेवतो आहोत का?
“गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात फक्त भक्ती नव्हे, तर कर्तव्याची जाणीव, जबाबदारीची जाणीव आणि परिवर्तनाची तळमळ दडलेली असावी. जर हे साधता आले, तरच लोकमान्य टिळकांची संकल्पना पुन्हा उजळून निघेल आणि गणेशोत्सव खऱ्या अर्थाने राष्ट्रजागृतीचे पर्व ठरेल. नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर फक्त पोकळ सजावट आणि प्रदूषणाने भरलेला उत्सव उरेल, ज्यात टिळकांची मौलिकता हरवून जाईल.
*आणि मग खरा प्रश्न असा उरेल — आपण पुढच्या पिढ्यांना काय देतो आहोत: जागृतीचा दीप की विकृत संस्कृती?*
*मित्रांनो, आता ठरवायचे आहे ते आपल्यालाच. आपण हा उत्सव केवळ बाह्य दिखाव्याचा मेळावा बनवतोय की टिळकांच्या स्वप्नातील समाजजागृतीचा दीप पुन्हा पेटवतोय? आज प्रत्येक घराघरातून, प्रत्येक मंडपातून हा संदेश निघाला पाहिजे की “गणपती बाप्पा मोरया” म्हणजे फक्त गजर नव्हे, तर एक बदलाचा हुंकार आहे.*
*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*
दिनांक : २७/०८/२०२५ वेळ : १३:२३