महायुती एकसंघतेवर प्रश्नचिन्ह; नागपुरात संघभूमी दर्शनावेळी राष्ट्रवादीची अनुपस्थिती चर्चेत

महायुती एकसंघतेवर प्रश्नचिन्ह; नागपुरात संघभूमी दर्शनावेळी राष्ट्रवादीची अनुपस्थिती चर्चेत

 

महापालिका निवडणुकांपूर्वी महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड; भाजप-शिवसेना एकत्र, अजित पवार गट दूर

 

नागपूर : येत्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला जात असला, तरी नागपुरातील रविवारी झालेल्या संघभूमी दर्शनावेळी महायुतीची एकसंघता प्रश्नांकित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे जवळपास सर्व आमदार रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

 

राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत सारे काही आलबेल असल्याच्या दाव्याला छेद बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. विशेष म्हणजे या मुद्द्यावर भाजप व शिवसेनेतील नेत्यांनी जाहीर प्रतिक्रिया देणे टाळले.

 

रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन मंत्री राजकुमार रावल, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार व नेते उपस्थित होते. यामध्ये माजी मंत्री व ज्येष्ठ नेत्यांचाही मोठा सहभाग दिसून आला.

 

यंदा संघाकडून कोणतेही बौद्धिक किंवा संघ परिचयाचे सत्र आयोजित करण्यात आले नव्हते. मात्र राजकीय उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

देशभक्तीची शताब्दी : एकनाथ शिंदे

संघाच्या शताब्दी वर्षाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रसिद्धीपासून अलिप्त राहून शंभर वर्षे राष्ट्रसेवेसाठी कार्य करणाऱ्या संघाची शताब्दी म्हणजे देशभक्तीची शताब्दी आहे. रेशीमबागला आल्यानंतर देशभक्ती आणि राष्ट्रसेवेची नवी ऊर्जा मिळते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे खरे देशभक्त आणि थोर व्यक्तिमत्त्व आहेत.”

 

बाल्यावस्थेपासून स्वयंसेवक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावेळी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे महायुतीतील समन्वय, विश्वास आणि आगामी राजकीय गणितांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें