राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून तरुणींची फसवणूक झाल्याच्या दोन दुर्दैवी घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र राजापूर’चे व्यवस्थापक राजन लाड यांनी ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ या शीर्षकाखाली जनजागृतीसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
गावागावात विविध व्यवसाय, विक्री, प्रचार, स्क्रॅच कार्ड, भेटवस्तू योजना किंवा इतर कारणांच्या निमित्ताने अनेक अनोळखी व्यक्ती फिरत असतात. त्यापैकी बहुसंख्य जण प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असले तरी काही अपवादात्मक घटना समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या दोन घटनांमध्ये पहिल्या प्रकरणात स्क्रॅच कार्ड आणि भेटवस्तू योजनेच्या निमित्ताने फिरणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने एका तरुणीला फूस लावून तिच्यासोबत पलायन केले. तर दुसऱ्या घटनेत आसरा व रोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून घरातील तरुणीला पळवून नेण्यात आले.
या घटनांमधील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे संबंधित मुली सज्ञान, म्हणजेच १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असल्याने त्यांनी स्वतःच्या इच्छेने गेल्याचे सांगितल्यास पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या हातात कायद्याने काहीच राहत नाही. परिणामी कुटुंबीयांना मानसिक त्रास आणि हतबलता याशिवाय काहीच उरत नाही, असे आवाहनात नमूद केले आहे.
म्हणूनच समाज म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगताना गावात नवीन येणाऱ्या व्यक्तीची माहिती जाणून घेणे, तरुण मुला-मुलींना अनोळखी व्यक्तींच्या आमिषांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करणे, पालकांनी आपल्या मुलांशी नियमित संवाद ठेवणे, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित ग्रामपंचायत, पोलिस पाटील किंवा पोलिसांना माहिती देणे आणि सोशल मीडियावरील व प्रत्यक्ष भेटीत होणाऱ्या अनोळखी संबंधांबाबत जागरूकता निर्माण करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
“घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा घटना घडू नये यासाठी सतर्क राहणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत ही पोस्ट कोणत्याही व्यवसाय किंवा समाजघटकाला दोष देण्यासाठी नसून सामाजिक सुरक्षितता, जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी असल्याचे राजन लाड यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या गावातील व कुटुंबातील तरुण पिढीच्या सुरक्षिततेसाठी ही जनजागृतीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे
बातमीदार -प्रशांत पवार,












