:सांगलीत पुराचा धोका वाढला; कोयना-चांदोली धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांच्या स्थलांतराची तयारी
कृष्णा नदीची पातळी ३२ फूटांपर्यंत जाण्याचा अंदाज; अनेक बंधारे पाण्याखाली, महापालिकेकडून निवारा केंद्रे सज्ज
सांगली : कोयना, चांदोलीसह विविध धरणांतून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे सांगली शहरावर पूरस्थितीचे सावट गडद झाले आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असून पुराचे पाणी शहराच्या वेशीपर्यंत पोहोचले आहे. काकानगर, सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली असून महापालिकेनेही निवारा केंद्रे सज्ज ठेवली आहेत.
आयर्विन पुलाजवळ रविवारी नदीची पाणीपातळी ३० फूटांवर पोहोचली असून पुढील काही तासांत आणखी दोन ते तीन फूट वाढ होण्याची शक्यता पूर नियंत्रण कक्षाने व्यक्त केली आहे. पाटबंधारे विभागाच्या अंदाजानुसार कृष्णा नदीची पातळी ३२ फूटांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे जामवाडीसह सखल भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना व चांदोली धरणांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांतील पाणीपातळी वाढत आहे. परिणामी अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक बंद करण्यात आली आहे. समडोळी-कोथळी बंधाऱ्यावरून सुमारे चार फूट पाणी वाहत आहे, तर नांद्रे-ब्रम्हनाळ मार्गावरील बंधाऱ्यावर सहा फूट पाणी असल्याने हा मार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. म्हैसाळ बंधाराही पाण्याखाली गेला असून शिराळा तालुक्यातील चिकुर्डे येथील बंधारा यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
सध्या कोयना धरणातून प्रतिक्षणी ३३,८२६ क्युसेक, तर चांदोली धरणातून ६,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात ९१.३२ टीएमसी म्हणजेच सुमारे ८७ टक्के, तर चांदोली धरणात २९.७६ टीएमसी म्हणजेच ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यावरून कृष्णा नदीत सुमारे १ लाख ७ हजार ७५० क्युसेक पाणी वाहत आहे. तसेच महापुराचा धोका कमी करण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवून तो १ लाख ३० हजार क्युसेक करण्यात आल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत सांगली जिल्ह्यात सरासरी केवळ १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक १०.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. स्थानिक पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणांमधील विसर्गामुळे नदीकाठच्या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे










