लांजा महावितरणचा हलगर्जीपणा; रुण धनगरवाडी सलग तिसऱ्या दिवशी अंधारात, ग्रामस्थांचा संताप
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; जनावरांची गैरसोय, लहान मुले व वृद्धांचे हाल – तात्पुरत्या व कायमस्वरूपी ३-फेज वीजपुरवठ्याची मागणी
लांजा | प्रतिनिधी : जितेंद्र चव्हाण
लांजा तालुक्यातील रुण धनगरवाडी येथे महावितरणच्या कथित हलगर्जी कारभारामुळे आज सलग तिसऱ्या दिवशीही वीजपुरवठा खंडित असून संपूर्ण वाडी अंधारात आहे. गेल्या तीन दिवसांपासून वीज नसल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याच्या पाण्याची टंचाई, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पाळीव जनावरांची गैरसोय यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
धनगरवाडीतील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व पशुपालनावर अवलंबून आहे. त्यामुळे गुरांचे गोठे, शेळ्या-बकऱ्यांची देखभाल तसेच इतर दैनंदिन कामांसाठी विजेची अत्यंत आवश्यकता असते. मात्र सलग तीन दिवस वीज नसल्याने जनावरांची देखभाल करणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात असल्याने कोणतीही आपत्कालीन किंवा वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सध्या वाडीत सिंगल फेज वीजपुरवठा असून ज्या ठिकाणाहून ३-फेज लाईन येते, त्यातील एक फेज बंद आहे. कार्यरत असलेल्या दुसऱ्या फेजवरून तात्पुरती जोडणी देऊन वीजपुरवठा सुरू करावा, अशी रास्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासोबतच रुण धनगरवाडीसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र ३-फेज वीज लाईन उपलब्ध करून देण्याची मागणीही नागरिकांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या समस्यांना आळा बसून ग्रामस्थांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक रहिवासी रुपेश काळे, प्रकाश गोरे आणि समस्त ग्रामस्थांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने या गंभीर समस्येची त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच रुण धनगरवाडीसाठी कायमस्वरूपी ३-फेज लाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.










