गुहागरच्या कुटगिरी गावठाणवाडीत लोखंडी पूल कोसळला; १० ते १२ गुरे अडकली, एका बैलाचा मृत्यू

गुहागरच्या कुटगिरी गावठाणवाडीत लोखंडी पूल कोसळला; १० ते १२ गुरे अडकली, एका बैलाचा मृत्यू

नदीत पाणी आणि लोखंडी गर्डरमुळे बचावकार्यात अडथळे; महसूल प्रशासन, तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी, ग्रामस्थांचा संताप

गुहागर | प्रतिनिधी :

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असतानाच त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ गुरे पुलाखाली अडकली. या दुर्घटनेत दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, उर्वरित जनावरे लोखंडी गर्डरखाली अडकली असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ दिलीप खेतले यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना घडताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने आणि पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी येत आहेत. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचविण्याचा प्रयत्न करत असले तरी लोखंडी संरचना हटविल्याशिवाय अनेक जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

 

घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, तहसीलदार तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पाचारण करण्यात आले असून संबंधित अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. बचावकार्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीसह जेसीबी मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

 

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा लोखंडी पूल सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुलाचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि नवीन पुलासाठी प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू होते. अधिकारी नुकतीच पाहणी करून गेले असतानाच पूल कोसळल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हा पूल गावातील नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. गावाच्या पलीकडे शेती तसेच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने संपूर्ण गाव या पुलावर अवलंबून होते. पूल यापूर्वीही धोकादायक झाल्यानंतर ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चातून जेसीबीच्या सहाय्याने तो उचलून वेल्डिंग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा नवीन पुलाचे काम वेळेत न झाल्याने अखेर ही दुर्घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

बातमी साभार – सचिन कुळे 

दरम्यान, पुलाखाली अडकलेल्या सर्व जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें