*रत्नागिरीत ‘न्याय स्वराज्य सभा’; संविधान, न्याय आणि लोकशाहीवर सखोल विचारमंथन*
*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
रत्नागिरी : संविधान, न्याय आणि लोकशाहीच्या मूल्यांवर नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी येथे ‘न्याय स्वराज्य सभा’ उत्साहात पार पडली. या सभेचे प्रमुख मार्गदर्शक संविधान विश्लेषक वकील अॅड. असीम सरोदे होते.
रत्नागिरी तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सभेला उपस्थिती लावली. यावेळी रत्नागिरीतील विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांचे हक्क, संविधानिक मूल्ये, न्यायव्यवस्था आणि लोकशाहीच्या बळकटीकरणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
सभेत अॅड. स्वप्नील खोपकर, अॅड. विवेक भोपी आणि अॅड. रोशन पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी कायद्याची माहिती करून घेणे, आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणे आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचा लोकशाही मार्गाने वापर करणे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
‘हक्क आणि न्यायाचा समतोल’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रश्नांवर विचारमंथन करण्यात आले. समाजातील प्रश्नांकडे संविधानिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज तसेच आगामी काळात जागरूक, सक्षम आणि संविधानिक मूल्यांची जाण असलेली पिढी घडविण्यासाठी अशा संवादाची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या सभेच्या माध्यमातून रत्नागिरीतील विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने संवाद साधत नागरिकांना कायदा, संविधान आणि लोकशाहीविषयी अधिक जागरूक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी सहकार्य केले.









