कोकण सुपुत्र गणेश कदम यांची भाजपाच्या कल्याण जिल्हा सचिवपदी नियुक्ती
: गुहागर तालुक्यातील काताळे गावचे ग्रामस्थ व डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांच्यावर भाजपाने सोपविली महत्त्वाची जबाबदारी
गुहागर (संदेश कदम) : कोकणचे सुपुत्र, गुहागर तालुक्यातील काताळे गावचे ग्रामस्थ, डोंबिवलीतील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांची भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कोकणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार, कार्य आणि संघटन तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी काळात अधिक जोमाने काम करणार असल्याचे गणेश कदम यांनी सांगितले.
“पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने काम करणार,” असा विश्वास गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या हस्ते गणेश कदम यांना पदनियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पदाधिकारी संदीप माळी, ज्ञानेश्वर आलम यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नंदकिशोर (नंदू) परब म्हणाले की, “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय इतिहास घडविणाऱ्या सशक्त कार्यकर्त्यांमधील गणेश कदम हे एक महत्त्वाचे घटक आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी ते निष्ठेने आणि संपूर्ण ताकदीने पार पाडतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
गणेश कदम यांच्या नियुक्तीमुळे गुहागर आणि कोकणातील भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नव्या जबाबदारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








