तवसाळ तांबडवाडीत शारदीय उत्सव सोहळा उत्साहात साजरा
ढोल-ताशांचा गजर, लेझीम नृत्य आणि जाकडीच्या तालावर विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

गुहागर : तवसाळ (सचिन कुळये)
मौजे तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत सालाबादप्रमाणे शारदीय उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सरस्वती देवीच्या आगमनासाठी करण्यात आलेली जय्यत तयारी, ढोल-ताशांच्या गजरात निघालेली विसर्जन मिरवणूक, लेझीम नृत्य आणि पारंपरिक कलांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.
या उत्सवात शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मंडळाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सरस्वती देवीचे आगमन होताच महिला मंडळातील महिलांनी ढोलकीच्या तालावर फेर धरत आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी जाकडी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उत्सवाची रंगत अधिकच वाढली. रात्री उशिरापर्यंत गरबा खेळत सहभागी मंडळींनी उत्सवाचा आनंद लुटला.
शारदीय उत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी, तसेच नव्या पिढीला आपल्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख व्हावी, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
शाळा परिवार आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला मंडळ आणि सर्व सहकार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.
शाळा, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्यातील एकोपा अधोरेखित करणारा तवसाळ तांबडवाडी येथील हा शारदीय उत्सव सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.











