*चाफेरी सहानवाडीत १५ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाची परंपरा कायम
*महिला भगिनींच्या पुढाकारातून सांस्कृतिक वारसा जतन; लोकसहभागातून ग्रामीण विकासाचा संदेश
*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
चाफेरी सहानवाडी येथे कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सव सोहळा उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ महिला भगिनींच्या पुढाकाराने सातत्याने साजरा होणारा हा पारंपरिक उत्सव परिसराची सांस्कृतिक ओळख बनला असून, त्यातून सामाजिक एकोपा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याची भावना जपली जात आहे.
या सोहळ्याला उपस्थित राहून सर्वांना कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ‘जनहित फाउंडेशन’च्या माध्यमातून लोकसहभागातून ग्रामीण विकास साधण्याच्या संकल्पनेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या गरजा ओळखणे, विकासाचा आराखडा स्वतः तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकसहभागातून उभा राहिलेला विकास अधिक शाश्वत आणि गतिमान ठरू शकतो, असा संदेश यावेळी देण्यात आला.
सण-उत्सव हे केवळ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम नसून समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. अशा प्रसंगी सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर सकारात्मक चर्चा करून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि समाजहिताच्या कार्यासाठी लोकांना प्रेरित करणे गरजेचे आहे, यावरही भर देण्यात आला.
महिला भगिनींनी गेल्या अनेक वर्षांपासून जपलेली ही परंपरा कौतुकास्पद असून, त्यांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. याच उत्साहातून भविष्यात ग्रामीण विकास, सामाजिक एकोपा आणि सकारात्मक परिवर्तनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
चाफेरी सहानवाडीतील हा दीपोत्सव पारंपरिक संस्कृती जपण्यासोबतच समाजप्रबोधन आणि लोकसहभागातून गावाच्या विकासाचा विचार पुढे नेणारा उपक्रम ठरत आहे.










