*अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), यांच्या वतीने मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘उत्तम कार्यपद्धत सन्मान – बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड प्रदान
आबलोली (संदेश कदम )
अँन्टि करप्शन बोर्ड (रजि.), उपभोक्ता एवं मानव अधिकार रक्षा समिती (रजि.) व ऑनररी डॉक्टरेट अवॉर्ड फाउंडेशन (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथे महाराष्ट्र राज्य सेमिनार व दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात गुहागर तालुक्यातील मळण गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन जाधव यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड – 2026 देऊन गौरविण्यात आले.
मुंबई, दादर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात राज्यभरातून आलेले पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, ग्राहकांचे व सामान्य नागरिकांचे हक्क, तसेच सामाजिक न्यायासाठी केलेल्या उल्लेखनीय व उत्तम कार्यपद्धतीबद्दल जाधव यांचा हा सन्मान करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे गुहागर तालुक्यातील त्यांच्या मित्रपरिवारात व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.













