तळवली हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा….
तळवली (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली, ता. गुहागर या प्रशालेमध्ये ‘ 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते प्रशालेतील महिला शिक्षिकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी प्रशालेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कुळे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले त्यानंतर प्रशालेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या जेष्ठ शिक्षिका सौ. ए.डी.नाईक मॅडम, सौ. एन. एन. कांबळे मॅडम,कुमारी सावंत मॅडम या शिक्षिकांना मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ शिक्षिका सौ.ए.डी. नाईक मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आपले मौलिक विचार व्यक्त केले, त्या म्हणाल्या पूर्वी या देशातल्या महिलांना विषमतेची वागणूक दिली जात होती, महिलांनी कितीही कष्ट केले तरी त्यांना पुरुषप्रधान संस्कृतीत मानाचे स्थान दिले जात नव्हते,आजच्या स्रियांनी आपल्या हिमतीच्या जोरावर आपण अबला नसून सबला आहोत हे कतृत्वाने सिद्ध केले आहे.तरीही काही ठिकाणी महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. तसेच त्यांनी इतिहासाची उदाहरणेही दिली. ताराबाई शिंदे लिखित ‘ स्त्री पुरुष तुलना ‘ या पुस्तकाचा आधार घेऊन त्यांनी त्यावेळी केलेल्या कार्याचा आढावाही त्यांनी घेतला. मुलींच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ, माता रमाई यांच्या कतृत्वाची आठवण करून दिली व आजच्या मुलींना देखील आपण अबला नसून सबला आहोत, सर्व क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने आपणही कतृत्व सिद्ध करु शकतो अशा प्रकारचा आत्मविश्वास विद्यार्थींनीच्यामध्ये निर्माण केला. व सर्व उपस्थितांना महिला दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार सर यांनीही मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.
शेवटी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर यांनी सर्व उपस्थित महिला शिक्षिका व शिक्षक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
तळवली हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा.