राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
मुंबई – राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ई-बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, महाराष्ट्रात केवळ इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला परवानगी असेल आणि पेट्रोल बाईकवर निर्बंध असतील.
राज्य सरकारतर्फे या योजनेसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. हा निर्णय प्रवाशांना कमी खर्चात अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी घेण्यात आला आहे. यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या टॅक्सी सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर नियमावली तयार करण्यात येणार आहे. यामध्ये दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नयेत यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्या ई-बाईकला परवानगी असेल.
राज्यभरात ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठरवण्यात आली आहे. यासाठी ५० बाईक एकत्र घेणाऱ्या संस्थांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल. प्रवासी भाड्याच्या संदर्भातील निर्णय अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. हा निर्णय राज्यातील प्रवासी आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.