मनसेचा प्रदूषण नियंत्रण मंडळावर हल्लाबोल – कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रत्नागिरी औद्योगिक वसाहतीतील जलप्रदूषण आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी गेलेल्या मनसे शिष्टमंडळाला अधिकारी जागेवर नसल्याचे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांनी “अतिरिक्त कार्यभारामुळे जमेल तसे येतो” असे उत्तर दिल्यानंतर मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि या गैरकारभाराचा निषेध नोंदवला.
औद्योगिक प्रदूषणाचा मासेमारांवर परिणाम
औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांद्वारे पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असून, मत्स्य प्रक्रिया उद्योगांमधून दूषित पाणी टँकरद्वारे थेट समुद्रात सोडले जात आहे. यामुळे समुद्र आणि खाडीतील प्रदूषण वाढून स्थानिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.
मनसेचा इशारा – दोन दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन
या संदर्भात मनसे शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, महिला शहर अध्यक्ष सुस्मिता सुर्वे, महिला शहर सचिव संपदा राणा, कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
– प्रतिनिधी, रत्नागिरी