राज्यातील गरोदर महिलांसाठी आनंदाची बातमी : सरकारी रुग्णालयात मोफत बेबी केअर किट
नवी मुंबई (मंगेश जाधव.प्रतिनिधी)
राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती झालेल्या नवजात शिशूंसाठी आणि मातांसाठी सरकारतर्फे मोफत बेबी केअर किट वाटप करण्यात येणार आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तब्बल २४ कोटी ७७ लाख रुपयांचे किट खरेदी केले असून, याचा लाभ सरकारी आरोग्य केंद्रात नाव नोंदणी केलेल्या आणि तेथेच प्रसूती झालेल्या महिलांना मिळणार आहे.
महिलांसाठी मोठी मदत
सन २०१९ पासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पहिल्या प्रसूतीच्या वेळी महिलांना मोफत बेबी केअर किट दिले जाते. प्रसूती सरकारी रुग्णालयात झाली आणि दोन महिन्यांच्या आत अर्ज सादर केला, तर या योजनेचा लाभ मिळतो. सरकारच्या या उपक्रमामुळे प्रसूती सरकारी रुग्णालयात करण्यासाठी महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळणार आहे.
किटमध्ये काय असणार?
या बेबी केअर किटमध्ये नवजात शिशू व मातेसाठी आवश्यक साहित्य समाविष्ट आहे. यात –
✔ मुलाचे कपडे
✔ छोटी गादी व टॉवेल
✔ प्लास्टिक डायपर
✔ मालिश तेल व थर्मामीटर
✔ मच्छरदाणी
✔ थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट
✔ शॅम्पू व बॉडी वॉश लिक्विड
✔ हातमोजे व पायमोजे
✔ हँड सॅनिटायझर
✔ आईसाठी गरम कपडे
✔ छोटी खेळणी
सर्वसामान्य महिलांसाठी दिलासा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे आई आणि बाळाच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेतली जाईल. नवजात बाळाला आईचे दूध आणि योग्य पोषण मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
राज्यातील गरोदर महिलांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, मोफत बेबी केअर किटमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे.