चुलत्यांच्या कृपेने बरं चाललंय; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
बीड, ३ एप्रिल: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड दौऱ्यावर विविध कामांचा आढावा घेतला आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. युवा संवाद मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत काही सूचना दिल्या तसेच काही कानपिचक्या देखील दिल्या. त्यांच्या भाषणातील एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
“कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं,” असे विधान करत अजित पवार यांनी आपल्या यशाचे सर्व श्रेय शरद पवार यांना दिले. या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
डिजिटल प्रचाराचे महत्व आणि कार्यकर्त्यांना सूचना
युवा संवाद मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी तरुणांना डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला. “प्रचारासाठी डिजिटलचा वापर करा, पण तो चांगल्या कामासाठी करा. काही वेळा सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. कोणत्याही समाजाच्या व्यक्तीविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकणे टाळा. तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे, त्यामुळे तुम्ही डिलीट केलेले संदेशही पुन्हा मिळू शकतात. त्यामुळे जबाबदारीने वागा,” असा इशारा त्यांनी दिला.
गुन्हेगारी प्रवृत्तीला सुटता न देता कठोर भूमिका
अजित पवार यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिशी घालणार नाही, असा ठाम संदेश दिला. “जर कोणी चुकीचं वागत असेल आणि त्याचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचतात, हे स्पष्ट झाले, तर कुणालाही पाठीशी घालणार नाही. मी काहींना मकोका लावायला सांगितले आहे. मी दादागिरी खपवून घेणार नाही,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “जर कोणी अशा प्रकरणांत अडकला, तर मी मदतीला पुढे येणार नाही. उलट पोलिसांना त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगीन. कोणीही चुकीच्या गोष्टी करू नयेत.”
नेत्यांच्या पाया पडू नका – अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेला अजून एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे “नेत्यांच्या पाया पडू नका” हा होता. “आईवडिलांच्या, गुरूंच्या पाया पडा, पण आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांच्या पाया पडावे, पण उगाच कोणत्याही नेत्याच्या पाया पडू नका. ही लाचारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी त्यांच्या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators