देवरुखमध्ये राष्ट्रसेविका समितीचा निवासी प्रारंभिक वर्ग उत्साहात पार
दक्षिण व उत्तर रत्नागिरीतील ५८ बालिकांचा सहभाग; शारीरिक-मानसिक विकासाचे प्रभावी प्रशिक्षण
देवरूख (ता. संगमेश्वर) येथे राष्ट्रसेविका समिती, दक्षिण रत्नागिरीच्या ५ दिवसांच्या निवासी प्रारंभिक वर्गाचा समारोप उल्हासपूर्ण वातावरणात झाला. श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भरलेल्या या वर्गात दक्षिण व उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून ५८ बालिकांनी सहभाग घेतला होता. “जय जननी जय पुण्य धरा” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित वर्गाचे आयोजन मुलींच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी करण्यात आले होते.
या वर्गामध्ये काठी, लेझीम, यष्टि, योगासने अशा क्रियाकलापांबरोबरच विविध चर्चासत्रे, कार्यशाळा व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वर्गाचे उद्घाटन समितीच्या गोवा विभागाच्या वर्गाधिकारी सुनंदाताई आमशेकर यांच्या हस्ते झाले. या वर्गात देशभक्तीपर समूहगीते, प्रार्थना, श्लोक, पारंपरिक खेळ, रांगोळी व चित्रकला आदींना विशेष महत्त्व देण्यात आले.
बौद्धिक सत्रात सुनंदाताई आमशेकर, उमाताई दांडेकर, श्रेयाताई सरदेशपांडे, दिपालीताई कशेळकर आणि स्मिताताई आंबेकर यांनी मार्गदर्शन केले. तर विविध प्रशिक्षणांचे सत्र सेजल वास्कर, सोनाली सुर्वे, तृप्ती सावंत व नयन शिंदे यांनी घेतली. राधिका गानू (मुख्य शिक्षिका), रिद्धी धामणे (सहशिक्षिका), पूर्वा चौगुले, साक्षी शिंदे व तन्वी परांजपे यांनी देखील प्रशिक्षण दिले.
दररोजच्या बौद्धिक विषयानुसार वंदे मातरम, अहिल्याबाई होळकर, समिती सण-उत्सव यावर आधारित प्रदर्शने सादर करण्यात आली. तसेच देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाची विविध दालने आणि सृजन सायन्स सेंटरलाही विद्यार्थिनींनी भेट दिली. समारोप प्रसंगी स्मिताताई आंबेकर यांच्या उद्बोधनाने उपस्थितांची प्रेरणा वाढली. कार्यक्रमाचे आयोजन नगर शाखा कार्यवाहीका सुमनताई हेबाळकर व वर्गाधिकारी सुनंदाताई आमशेकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
बालिकांनी सादर केलेली सूर्यनमस्कार, दंड, लेझीम व योगासने यांची प्रात्यक्षिके हे वर्गाचे विशेष आकर्षण ठरले. देवरुख परिसरातील बंधू-भगिनींच्या सहकार्यामुळे हा वर्ग यशस्वी झाला.
हॅशटॅग्स:
#देवरुख #राष्ट्रसेविका #प्रारंभिकवर्ग #रत्नागिरी #बालविकास #शारीरिकशिक्षण #योगासने #समितीकार्यक्रम
फोटो