१०२ वर्षांच्या वयात स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे निधन.
स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग, देहदान करून अखेरच्या क्षणीही दिला समाजसेवेचा संदेश
पनवेल : स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवणारे तसेच राष्ट्रसेवा दल, अध्यापन आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय गांधी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 102 वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार मुंबईच्या नायर रुग्णालयात देहदान करण्यात आले.
दत्तात्रय गांधी यांचा जन्म 15 मे 1923 रोजी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे झाला. त्यांचे वडील गोपीनाथ लालाजी गांधी, मोठे भाऊ शंकर गांधी आणि धाकटे भाऊ प्रभाकर गांधी हे तिघेही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. दत्तात्रय गांधी यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतला होता. यामुळे त्यांना दीड वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी साने गुरुजींच्या प्रेरणेने शिक्षक म्हणून कार्य केले आणि मुंबईच्या छबीलदास शाळेत तब्बल ३५ वर्षे अध्यापन केले. नर्मदा बचाव आंदोलन आणि यवतमाळमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले.
स्व. गांधी यांच्या पश्चात तीन मुली, एक जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे.
—
#स्वातंत्र्यसैनिक #दत्तात्रयगांधी #पनवेल #स्वातंत्र्यलढा #राष्ट्रसेवादल #देहदान #श्रद्धांजली #रत्नागिरीवार्ताहर
—
???? फोटो