????️ रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : रेड अलर्ट जाहीर, अनेक घरांना स्थलांतराचे आदेश
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी व राजापूर तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, पावस बाजारपेठ व गोळप मानेवाडी परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची धांदल उडाली आहे. गोळप मानेवाडीत डोंगर कोसळून काही मोटारसायकली मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या भागातील ८ घरांतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत.
पावस बाजारपेठेत तर नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने “जीव मुठीत घेऊन” घरात बसण्याची वेळ आली. संतोष सुर्वे यांच्या घरातही पाणी शिरल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मावळंगे येथील थुळवाडीतील संदेश थुळ यांच्या घरावर शनिवारी सकाळी वाऱ्यामुळे नारळाचे झाड कोसळले. वाऱ्याचा वेगही चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
⛈️ जिल्ह्यात दरड कोसळणे, झाडे उन्मळणे आणि घरांत पाणी शिरणे या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. प्रशासन सतर्क असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे. नागरिकांनी नद्यांच्या काठावर, डोंगर उतारांवर किंवा धोका असलेल्या भागात राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.