२१ जून रोजी त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आहे:
डॉ. अर्जुन महादेव मुरुडकर: एक प्रेरणादायी प्रवास….
आज २१ जून रोजी डॉ. अर्जुन महादेव मुरुडकर त्यांच्या आयुष्याच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव, मुंबईचे माजी महानगर दंडाधिकारी, तसेच राजस्थान येथील जेजेटी विद्यापीठ आणि उत्तर प्रदेश येथील श्री वेंकटेश्वरा विद्यापीठाचे माजी कुलगुरु अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत.
बालपण आणि शिक्षण
डॉ. मुरुडकर यांचा जन्म २१ जून १९४६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील निसर्गरम्य मुरुड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुरुड येथील महर्षी धोडो केशव कर्वे विद्यामंदिरात झाले. महर्षी कर्वे शताब्दी सोहळ्यात त्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचे भाग्य त्यांना लाभले होते.
त्यांचे पुढील शिक्षण दापोली येथील नवभारत छात्रालयात झाले, जे ख्यातनाम शिक्षणतज्ञ व समाज सुधारक अप्पासाहेब पटवर्धन, माजी खासदार शामरावजी पेजे, द. सि. सामंत गुरुजी आणि पांडुरंग शिंदे गुरुजी यांनी स्थापन केले होते. दापोलीच्या ए.जी. हायस्कूलमधून त्यांनी प्राचार्य पी.व्ही. भावे आणि प्राचार्य एम.टी. तलाठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालांत परीक्षा उत्तीर्ण केली.
भारतीय हवाई दलातील सेवा
राष्ट्रप्रेमाची तीव्र ज्योत मनात असल्यामुळे त्यांची भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून निवड झाली. कोंकणपुत्र असलेले ते भारताचे सुपुत्र बनले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. युद्धातील त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना “संग्राम मेडल” व “पसछिम स्टार” (Paschim Star) ही पदके देऊन सन्मानित केले आहे.
शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द
भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई, जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्था, मुंबई आणि मुंबई विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही काम केले.
कालौघात त्यांनी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमधून बी.ए., एम.ए., एल.एल.बी., एल.एल.एम., पीएच.डी., डी.लिट. आणि एल.एल.डी. या पदव्या संपादन केल्या.
याशिवाय, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील, मुंबई महानगरचे विशेष महानगर दंडाधिकारी, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव, राजस्थान येथील जेजेटी विद्यापीठाचे कुलगुरु आणि उत्तर प्रदेश येथील श्री वेंकटेश्वरा विद्यापीठाचे कुलगुरु असा एक अद्वितीय प्रवास केला आहे. त्यानंतर डेहराडून येथील हिमगिरी झी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणूनही त्यांची निवड आणि नामांकन झाले होते.
पुरस्कार आणि सन्मान….
आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार व पारितोषिके मिळाली आहेत. त्यांमध्ये मुंबई विद्यापीठातर्फे “स्क्रोल ऑफ ऑनर” (सन्मानपत्र), लंडन येथील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीने दिलेली “डॉक्टर ऑफ लिटरेचर” (डी. लिट.) आणि पॅरिस येथील युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने दिलेली (एल.एल.डी.) या मानद पदव्यांचा समावेश आहे.
सामाजिक कार्य
दापोली-मंडणगड तालुक्यातील असंघटित माजी सैनिकांना एकत्र आणून “दापोली मंडणगड माजी सैनिक संघ” स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
डॉ. मुरुडकर यांचा जीवनसंघर्ष आदर्शवत असून नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
त्यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद
साभार – ज्येष्ठ पत्रकार. प्रकाश पेंडसे. मुंबई