ई-चलनाच्या सक्तीसह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; वाहतूक ठप्प होण्याची शक्यता
वाहन चालक-मालक संघटनांचा २ जुलैपासून बेमुदत संप.
पुणे: महाराष्ट्रातील प्रवासी आणि मालवाहतूक संघटनांनी येत्या २ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांकडून जबरदस्तीने ई-चलनाद्वारे दंड आकारला जात असल्याचा, शहरांमध्ये वाहतुकीस प्रतिबंधात्मक प्रवेश, तक्रार निवारण प्रक्रियेतील विलंब, अतिरिक्त कामगारांची सक्ती यांसारख्या अनेक मागण्यांबाबत सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य वाहन, चालक, मालक आणि प्रतिनिधी महासंघाने बुधवारी एका निवेदनाद्वारे केला आहे.
नुकतीच प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या राज्यातील विविध संघटनांची एक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला वाहतूक संघटना महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे, वाहतूकदार बचाव कृती समितीचे संयोजक उदय बर्गे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रकाश गवळी आणि इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने दहा दिवसांत मागण्या मान्य न केल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्यावर यावेळी एकमत झाले, असे या निवेदनात नमूद केले आहे. या संपाला राज्यातील सर्व वाहन संघटना आणि वाहतूकदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.
प्रमुख मागण्या:
* सक्तीच्या ई-चलन वसुलीला तात्काळ स्थगिती द्यावी.
* ई-चलन तक्रारींचे वेळोवेळी निराकरण व्हावे.
* स्वच्छतेसाठी अतिरिक्त कामगारांची अनिवार्यता अट रद्द करावी.
* व्यावसायिक वाहने उभी करण्यासाठीच्या (नो एन्ट्री) विभागातील निर्बंधांचा पुनर्विचार करावा.
महाराष्ट्र राज्य वाहन, चालक, मालक आणि प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे यांनी म्हटले आहे की, “राज्य सरकारने प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर जाचक अटी लादल्या आहेत. याबाबत राज्य सरकारकडे वारंवार मागणी करूनही कोणताही तोडगा काढला जात नाहीये. त्यामुळे, २ जुलैपासून राज्यातील सर्व वाहतूक संघटना बेमुदत संपावर जाणार आहेत.”
#MaharashtraStrike #TransportStrike #EChallan #PuneNews #MaharashtraNews #VahtukSamp #वाहतूकबंद #महाराष्ट्रबंद #ईचलन #पुणे #वाहनचालक #मालवाहतूक















