अंबादास दानवे: ‘पुन्हा या, पण याच पक्षातून!’ – उद्धव ठाकरेंचा टोला
मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरे यांना ‘खुली ऑफर’ दिली, तर दुसरीकडे ठाकरे यांनी दानवे यांच्या कौतुकाद्वारे शिंदे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना उद्देशून म्हटले, “अंबादास, तुम्ही पुन्हा या, पण याच पक्षातून या!” यावर मिश्किलपणे उत्तर देत दानवे म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांप्रमाणे पुन्हा येईन, पण कुठून येईन ते मात्र विचारू नका.”
ठाकरे यांनी दानवे यांच्या कार्याची प्रशंसा करत म्हटले, “तुमची पहिली टर्म पूर्ण झाली आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ असं जोरात म्हणा. पण ते याच पक्षातून असंही म्हणा.” दानवे यांची आमदारकीची मुदत संपल्याने त्यांना शिंदे गट आणि भाजपमधून ऑफर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
यापूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलताना म्हटले होते की, “अंबादास हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही.” यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले, “अंबादास दानवे हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत, पण त्यांनी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. समोरच्या ताटात काही चांगलं दिसलं म्हणून तिथे गेला नाहीत.”
जनतेच्या मनातील प्रतिमा महत्त्वाची:
“पदं येतात आणि पदं जातात, पण जनतेच्या मनात आपली काय प्रतिमा राहते हे महत्त्वाचं आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, “गेल्या आठवड्यात अंबादास माझ्या घरी आले होते. त्यावेळी टर्म संपतेय, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही असं मी त्यांना म्हणालो. पण आतापर्यंत जे दिलंय ते खूप दिलंय असं अंबादास म्हणाले.”
ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा टोला लगावला, “भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता भाजपने आम्हाला दिला, याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. मात्र ते माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण त्यांनी माझ्याकडून घेतलेले नेते हे वेगळेच आहेत.”
#MarathiNews #Politics #UddhavThackeray #AmbadadasDanve #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #शिवसेना #भाजप #राजकारण #ब्रेकिंगन्यूज #MaharashtraPoliti
calDrama