रत्नागिरीत युतीत बिघाडी: राणेंनी सामंतांच्या बालेकिल्ल्यातच सुरु केली ‘फोडाफोडी’
भाजप-शिंदे गटात कार्यकर्त्यांसाठी रस्सीखेच; सामंत आता काय करणार?
रत्नागिरी, [प्रतिनिधि]: रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच ‘कार्यकर्ते फोडाफोडी’ चे राजकारण सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः मित्रपक्षांकडूनच मित्रपक्षाचे कार्यकर्ते फोडले जात असल्याने युतीमधील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे.
या घडामोडींना नवी दिशा मिळाली ती काल रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मंत्री नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमामुळे. त्यांनी शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नाचणे ग्रामपंचायतीमधील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने महिला वर्गाला भाजपमध्ये आणत जोरदार धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यात कार्यकर्त्यांच्या प्रवेशावरून जोरदार शाब्दिक वादावादी झाल्याचे वृत्त होते. याच पार्श्वभूमीवर, नितेश राणे यांनी तात्काळ दुसऱ्याच दिवशी नाचणे जिल्हा परिषद गटावर लक्ष केंद्रित करत, तेथील कार्यकर्ते आणि महिलांना भाजपमध्ये प्रवेश देऊन सामंतांना थेट आव्हान दिले आहे.
नाचणे येथे भाजपची जोरदार ‘एंट्री’
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, मंडळ अध्यक्ष प्रतीक देसाई आणि संदीप सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे:
* विशाल ओंधकर – शाखाप्रमुख, वॉर्ड क्र. ३
* सुमित पारकर – शाखाप्रमुख, वॉर्ड क्र. ४
* देवराज सुर्वे – उपशाखाप्रमुख, युवासेना
* सौ. शिवानी रेमुळकर – ग्रामपंचायत सदस्य, नाचणे
* सौ. अश्विनी शेलार – महिला आघाडी शाखा संघटक, वॉर्ड क्र. ५
* सौ. प्रमिला ठिक – महिला आघाडी उपविभाग संघटक, माजी ग्रामपंचायत सदस्य
* सौ. मंजिरी चव्हाण – महिला आघाडी उपशाखा संघटक
* सौ. सुमन घाणेकर – गटप्रमुख
* सौ. श्रेया घाणेकर – गटप्रमुख
* सौ. किरण हातखंबकर
* सौ. अनघा मोरे
* सौ. माधुरी तिवारी
* सौ. संध्या चवंडे
* सौ. पूजा गो. ठिक
या पक्षप्रवेशांच्या मालिकेनंतर, आता पालकमंत्री उदय सामंत भाजपचे कोणकोणते कार्यकर्ते किंवा पदाधिकारी फोडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रत्नागिरीतील युतीतील हा संघर्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय रंग दाखवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
#RatnagiriPolitics #युतीतीलसंघर्ष #BJPvsShivSena #NiteshRane #UdaySamant