फुणगुस ग्रामपंचायतीकडून माहिती लपवली जात असल्याचा आरोप; उपोषणा चा इशारा
रत्नागिरी प्रतिनिधी | निलेश रहाटे
संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस ग्रुप ग्रामपंचायतीकडून माहिती अधिकारात मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ सुभाष लांजेकर यांनी केला आहे. ग्रामविकास अधिकारी अशोक भुते यांनी जाणीवपूर्वक माहिती न दिल्याचा आरोप असून, त्यांच्याविरोधात माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अपील गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) यांच्याकडे सादर करण्यात आले होते.
या अपीलाची सुनावणी दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आली. मात्र, अपीलीय अधिकारी गैरहजर असल्यामुळे लांजेकर यांनी आपले लेखी मत सादर केले. त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नसल्यामुळे स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. अद्यापही आदेश जारी झाला आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) यांना RTI अर्जांबाबत ‘ऍलर्जी’ आहे का, असा सवाल लांजेकर यांनी उपस्थित केला आहे.
लांजेकर यांनी असा आरोप केला आहे की, वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामसेवक मुद्दाम माहिती लपवतो आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांना सार्वजनिक माहितीपासून वंचित ठेवले जात आहे. माहिती अधिकार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सुभाष लांजेकर यांचा उपोषणाचा इशारा
ग्रामपंचायतीच्या उदासीन व टाळाटाळीच्या धोरणाविरोधात सुभाष लांजेकर यांनी येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी पंचायत समिती संगमेश्वर (देवरुख) कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, राज्य माहिती आयोग (कोकण खंडपीठ) यांच्याकडे माहिती अधिकार कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.