दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सवलती, ‘स्वावलंबन’ कार्डही ग्राह्य
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा महत्त्वाचा खुलासा, कोणतीही सवलत नाकारली जाणार नाही.
रत्नागिरी: (वार्ताहर -सुजित सुर्वे )
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये मिळणाऱ्या सवलतींबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. एका वर्तमानपत्रात ‘ऑटिस्टिक’ (स्वमग्न) विद्यार्थ्यांच्या सवलतीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने राज्य मंडळाचे सचिव (पुणे) यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
मंडळाकडून १६ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार विविध सवलती दिल्या जातात. केंद्र शासनाने निश्चित केलेले स्वावलंबन प्रमाणपत्र (Unique Disability ID Card) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आता वैध मानले जाईल.
मंडळाने सर्व विभागीय मंडळांना कळवले आहे की, जर एखाद्या विद्यार्थ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्राऐवजी स्वावलंबन प्रमाणपत्र असेल आणि ते त्यांनी दिव्यांग प्रस्तावासोबत सादर केले असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या प्रतिस्वाक्षरी असलेल्या विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करू नये. यानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांना नियमानुसार सर्व सवलती दिल्या जातील.
सन २०२३-२४ पासून याबाबत कार्यवाही सुरू असून, कोणताही दिव्यांग विद्यार्थी निर्धारित सुविधांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता मंडळाकडून घेण्यात आली आहे. तसेच, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे स्वावलंबन प्रमाणपत्र नसले तरी, त्याच्याकडे विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र असेल, तरीही अशा विद्यार्थ्यांना मंडळाकडून नियमानुसार सर्व सवलती दिल्या जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे, संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
#DivyangStudents #BoardExam #MaharashtraBoard #StudentConcessions #UniqueDisabilityID #DahaviBaravi #MaharashtraNews #शिक्षणमंडळ #दिव्यांगविद्यार्थी