🛣️ अंबा घाटातून बोगदा; कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित
🚇 साडेतीन किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय
रत्नागिरी : कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारा अंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणं आणि अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने साडेतीन किलोमीटर लांबीच्या बोगद्याला मंजुरी दिली आहे.
सध्या एका खासगी एजन्सीकडून या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू आहे. या आराखड्यानुसार बोगद्याची लांबी, रुंदी आणि इतर तांत्रिक बाबी निश्चित करून अंदाजपत्रक तयार केलं जाणार आहे. त्यानंतर आवश्यक मंजुरीनंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर अंबा घाटातील सुधारणा आणि रुंदीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे सात किलोमीटर लांबीच्या या घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे धोकादायक भाग कायमस्वरूपी वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखून, घाटातील वन्यजीव, राष्ट्रीय उद्यान आणि जंगल परिसराचा विचार करून या प्रकल्पाचा अहवाल अंतिम स्वरूपात तयार होणार आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास या बोगद्यामुळे मदत होणार आहे.
—
🔖 हॅशटॅग्स :
#अंबाघाट #रत्नागिरी #कोल्हापूर #राष्ट्रीयमहामार्ग #कोकणप्रवास #बोगदा #पर्यटन















