साटवली ग्रामपंचायत मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवर करणार कारवाई?
लांजा प्रतिनिधी – जितेंद्र चव्हाण
लांजा तालुक्यातील साटवली येथे मागील अनेक महिन्यांपासून रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर साटवली ग्रामपंचायतीकडून वारंवार तोंडी सूचना देऊनही मोकाट गुरे सोडणारे काही मालक ऐकत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने आता थेट कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
निर्मळ ग्राम सचिवालय, साटवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की,
संबंधित मालकांची जनावरे २४ तास मोकाट फिरत असतात,
ही जनावरे रस्त्यावर आढळून येत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे,
त्यामुळे तात्काळ आपल्या गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा,
अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.
यापूर्वीही गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रफिक कोंडकरी, पोलीस पाटील सदानंद किल्लेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आंबोळकर यांनी मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांना भेट देऊन समज दिली होती. त्यावेळी त्यांच्या सह्या घेऊन नोंदही करण्यात आली होती तसेच ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून सूचना देण्यात आल्या होत्या.
सूचना करूनही संबंधित मालकांनी मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्याने आता ग्रामपंचायत स्तरावरून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण ठाकूरदेसाई यांनी स्पष्ट केले.















