राजकीय वास्तव नाकारण्याची किंमत: मुंबई काँग्रेस आणि हरलेली मुंबई – विश्वंभर चौधरी
विश्वंभर चौधरी यांची व्हायरल फेसबुक पोस्ट
मुंबई काँग्रेसनं उद्धव ठाकरेंशी आघाडी तोडून मतविभागणी करून दाखवली आणि तीस जागा भाजपा-शिंदेंना बहाल करून दाखवल्या.
कारण काय? तर राज ठाकरे सोबत आहेत आणि उत्तर प्रदेश आणि बिहारचा मतदार दुखावतो! गंमत आहे सगळी. उत्तर प्रदेशींनी आणि बिहारींनी काँग्रेसशी घटस्फोट घेऊन आता पाव शतक लोटलं आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री झाला 1989 साली म्हणजे तब्बल 37 वर्षांपूर्वी. बिहारात काँग्रेसचा शेवटचा मुख्यमंत्री झाला 1990 साली म्हणजे तब्बल 36 वर्षांपूर्वी. त्यानंतर दोन्ही राज्यातली जनता काँग्रेसशी इतकी वफादार राहिली की काँग्रेसला तिथं डबल डिजीटचे वांधे झाले. तरीही या घटस्फोटित पत्नीला वाईट वाटेल म्हणून आजचं लग्न तोडण्याचा व्यावहारिक वेडेपणा मुंबई काँग्रेसनं करून दाखवला. मराठी मतं दोन ठिकाणी करून दाखवली आणि भाजपा-शहासेनेला 30 जागा बहाल करून मुंबईत मविआ महापौर बसवण्याची संधी घालवून टाकली.
वर्षा गायकवाड यांचा वेळीच राजीनामा घेतला नाही तर ही हाराकिरी अशीच चालू राहील.
स्वतःच्या मतदारसंघाच्या धारावी भागात सातपैकी सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंचे निवडून येतात या घटनेची संगती जरी वर्षा गायकवाड यांना लावता आली तरी ठाकरेंशी युती न केल्याची किंमत त्यांना कळू शकेल.















