रायगड रोपवे २३ ते २८ फेब्रुवारी बंद; वार्षिक तांत्रिक देखभालीसाठी निर्णय
नवीमुंबई (मंगेश जाधव)
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे येणाऱ्या शिवभक्त, पर्यटक तसेच वृद्ध व अपंग व्यक्तींना सोयीचे दर्शन घडावे यासाठी उभारण्यात आलेली रायगड रोपवे सेवा वार्षिक तांत्रिक देखभाल व दुरुस्तीसाठी २३ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पूर्णतः बंद राहणार आहे. ही माहिती रायगड रोपवेचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर वर्षभर लाखो शिवभक्त आणि पर्यटक रोपवेच्या माध्यमातून दर्शन घेत असतात. मात्र रोपवेची सुरक्षितता आणि अखंड सेवा कायम ठेवण्यासाठी दरवर्षी नियोजित तांत्रिक तपासणी व देखभाल आवश्यक असते. त्यानुसार चालू वर्षात २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान रोपवे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रोपवे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १ मार्च २०२६ पासून रायगड रोपवे सेवा पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात येणार असून पर्यटकांच्या सेवेसाठी ती पूर्ववत उपलब्ध असेल. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी ही माहिती आगाऊ जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, रोपवे बंद असण्याच्या काळात पायरी मार्गे किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड पायरी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून तसेच स्थानिक यंत्रणांकडून योग्य नियोजन व सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड किल्ल्याच्या भेटीचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांनी ही बाब लक्षात घेऊन प्रवास आखावा, असे आवाहन रोपवे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















