कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश
वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा
राजापूर – संदीप शेमणकर
बदलत्या काळासोबत जुन्या, खर्चिक आणि रूढ झालेल्या परंपरांना छेद देत समाजाला नवी दिशा देणारे उपक्रम आता ग्रामीण भागातून पुढे येत आहेत. कोकणातील राजापूर तालुक्यातून अशीच एक कौतुकास्पद आणि समाजप्रबोधन करणारी घटना समोर आली आहे. राजापूर तालुक्यातील आडिवरे रुंढेवाडी येथील कुणबी बांधव तसेच कुणबी समाज सेवा मंडळ (रजि.) आडिवरे, कशेळी, गावखडी ग्रामीणचे उपाध्यक्ष विजय बंडबे यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर तेराव्या दिवशी वृक्षारोपण करून संपूर्ण कुणबी समाजासमोर एक नवा आणि आदर्शवत पायंडा घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
काही दिवसांपूर्वी विजय बंडबे यांच्या वडिलांचे निधन झाले होते. हिंदू परंपरेनुसार निधनानंतर अनेक धार्मिक विधी केले जातात, ज्यामध्ये दहावा, अकरावा आणि तेरावा या दिवसांना विशेष महत्त्व असते. सामान्यतः तेराव्याच्या दिवशी नातेवाईक आणि ग्रामस्थांना एकत्र बोलावून जेवण देण्याची किंवा इतर खर्चिक विधी करण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र बंडबे कुटुंबाने समाजासाठी काहीतरी वेगळं आणि पर्यावरणपूरक करण्याचा निर्णय घेतला.
वडिलांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि समाजाला एक सकारात्मक संदेश जावा, या उद्देशाने विजय बंडबे यांनी तेराव्या दिवशी वृक्षारोपण केले. केवळ झाडे लावून न थांबता, त्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेशही समाजासमोर ठेवला. आजच्या काळात वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज अधिक तीव्रतेने जाणवत असताना, बंडबे कुटुंबाचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“मृत व्यक्तीच्या स्मृती जपायच्या असतील तर समाजोपयोगी कार्य करा,” हा संदेश या कृतीतून अधोरेखित झाला आहे. पारंपरिक खर्चिक कार्यक्रमांपेक्षा पर्यावरणासाठी उपयुक्त उपक्रम राबवले, तर त्याचा फायदा पुढील पिढ्यांनाही होईल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
बंडबे कुटुंबाच्या या निर्णयामुळे समाजात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, भविष्यात अशाच प्रकारचे उपक्रम इतरांनीही राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातून समाजप्रबोधनाचा हा नवा आदर्श पुढे येत असल्याने, पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बदलाचीही नवी दिशा मिळताना दिसत आहे.














