मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन
युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा गझलकार पुरस्कार
मुंबई – संदीप शेमणकर
गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा आयोजित पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन येत्या ७ जून २०२६ रोजी मुंबई येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची, तर स्वागताध्यक्षपदी युवा गझलकार चेतन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी युवा गझलकार विशाल मोहिते यांना संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘युवा गझलकार – २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन युवा गझलकार स्वप्नील शेवडे यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ गझलनवाज भीमराव पांचाळे यांना ‘गझल मंथन जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच श्रीपाद जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव (देशमुख), डॉ. गिरीश इंगळे आणि प्रा. हेमंत सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
युवा गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गझल मंथन साहित्य संस्थेने विशेष युवा गझल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील सहभागींच्या गझलांचा ‘गझलयात्री’ हा संग्रह प्रकाशित करण्यात येणार असून, विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गझलयात्री संग्रह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
संमेलनात ज्येष्ठ गझलकारांचे मार्गदर्शन, विचारमंथनपर चर्चासत्रे आणि पाच दर्जेदार मुशायरे हे विशेष आकर्षण ठरणार आहेत. साहित्य, गझल आणि नवोदित प्रतिभांचा संगम घडविणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनाबाबतची माहिती संस्थेचे मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, महाराष्ट्र समन्वयक प्रणाली म्हात्रे तसेच मुंबई कार्यकारिणी अध्यक्षा योगिता तकतराव यांनी दिली.
गझलप्रेमींसाठी पर्वणी
देशभरातील युवा गझलकारांना एकत्र आणणारे हे संमेलन गझल साहित्याच्या जतन, संवर्धन आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे साहित्य वर्तुळात बोलले जात आहे.














