खेडमधील भोस्ते घाटात ट्रकची संरक्षक भिंतीला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी
खेड– मुंबई- गोवा महामार्गावरील खेडमधील भोस्ते घाटात मोठ्या वळणावर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याशेजारी असणाऱ्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकला. या अपघातात संरक्षक भिंत ढासळली असून ट्रकचेही पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे.
महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर सुरुवातीपासूनच अपघात होत असल्याचे चित्र आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर या ठिकाणी कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नसून हे वळण आहे तसे ठेवून वाहन चालकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाने केल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी घडणाऱ्या अपघातांवर उपाय म्हणून महामार्ग विभागाने गतिरोधकांची उभारणी केली होती. सद्यस्थितीला हे गतिरोधक काही ठिकाणी सुस्थितीत तर काही ठिकाणी खराब झाले आहेत. तर या गतिरोधकांमुळे अवजड वाहनांची एअर प्रेशर कमी होऊन गाड्यांना ब्रेक लागत नसल्याची माहिती वाहन चालकांकडून देण्यात येत आहे.















