तळवली प्रशालेचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार …
तळवली ( मंगेश जाधव) पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली ता. गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सोमवार, दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
या शुभेच्छा समारंभासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सुधाकर चव्हाण साहेब उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर यांनी केले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी व मार्गदर्शक शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, श्री. देवरुखकर सर, सौ. नाईक मॅडम, श्री. गवळी सर, श्री. केळस्कर सर, श्री. बागल सर, श्री. पुनस्कर सर, श्री. कुळे सर आणि सौ. एन. एन. कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव श्री. सुधाकर चव्हाण साहेब यांनी संस्थेच्या विविध शाखांचा विकास आणि भरभराटीचा आढावा घेतला व भविष्यातही सर्व शाखांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात घ्यावयाची दक्षता, योग्य आहार, तब्येतीची काळजी, तणावमुक्त परीक्षा देण्याचे महत्त्व तसेच परीक्षेत गैरमार्गांचा अवलंब टाळण्याचे परिणामकारक मार्गदर्शन केले.
या शुभेच्छा समारंभ प्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू घेण्यासाठी मुख्याध्यापकांकडे रोख रक्कम प्रदान केली. त्यातून आवश्यक वस्तू शाळेसाठी घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्याध्यापकांनी दिली.
समारंभास इयत्ता दहावी अ आणि इयत्ता दहावी ब या वर्गातील सर्व विद्यार्थी तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर आणि श्री. देवरुखकर सर यांनी केले, त्यांना इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. देवरुखकर सर यांनी केले आणि शेवटी सौ. ए. डी. नाईक मॅडम यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.