रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संरक्षण : एक अभिमानस्पद यश!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संरक्षण : एक अभिमानस्पद यश!

रत्नागिरी : फेब्रुवारी महिन्याच्या मध्यान्हापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनारपट्टीवर तब्बल ४८ हजार ७०१ ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी कांदळवन विभागाने संरक्षित केली आहेत. हे वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोकणचे खरोखरच मोठे यश म्हणावे लागेल.

रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी व उन्हाळ्यात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवाची वीण होते. दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंड्यांची हत्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काही वर्षांपूर्वी होत असे. परंतु कांदळवन विभागाने कासव मित्रांच्या मदतीने सागरी जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असलेल्या आणि सागरी पर्यावरण स्वच्छ करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कासवांची अंडी संरक्षित करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेतले आहे.

ते काम सध्या उत्तमरीतीने आणि गतीने सुरू आहे. त्यामुळेच वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर रत्नागिरी ते मंडणगड वेळास दरम्यान उभारलेल्या ४४८ घरट्यांमध्ये आतापर्यंत तब्बल ४८ हजार ७०१ अंडी संरक्षित करण्यात कांदळवन विभागाला यश आले आहे.

दापोली तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर १३६ घरटे उभारून १३ हजार ७०१ ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. या मोहिमेत आडे, मुरुड, लाडघर, दाभोळ, आंजर्ले, कर्दे, कोळथरे आणि केळशी या किनारपट्टीवरील गावांचा सहभाग आहे.

गुहागर तालुक्यात गुहागर, बाग, रोहीले आणि तवसाळ येथे २२७ घरट्यांमध्ये २२ हजार ९२२ अंडी संरक्षित केली आहेत. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यात अनुसरे (पानगरे) आणि माडबन येथे २९ घरट्यांमध्ये ३ हजार २८ अंडी संरक्षित केली आहेत.

रत्नागिरीतील गावखडी आणि मालगुंड येथे एकूण ५५ घरटे आणि मंडणगड तालुक्यातील वेळास येथे ३० घरट्यांमध्ये ३ हजार २३२ कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.

अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी ते मंडणगड वेळास पर्यंतच्या समुद्र किनारपट्टीवर ४४८ घरट्यांमध्ये एकूण ४८ हजार ७०१ ऑलिव्ह रिडले टर्टल महाकाय कासवांची अंडी संरक्षित करण्यास वन परिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकणच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचे प्राणी मित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

कासव संरक्षणाची ही मोहीम केवळ अंडी संरक्षित करण्यापुरती मर्यादित नसून, स्थानिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून सागरी जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणारी आहे. हा प्रयत्न निसर्गाच्या संतुलनासाठी आणि भावी पिढ्यांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे!

रत्नागिरी जिल्ह्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संरक्षण : एक अभिमानस्पद यश!

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...