ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता व तृतीयपंथीयांसाठी घरकुल मार्गदर्शनाचे आदेश
रत्नागिरी : शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून आलेल्या मागण्यांची पूर्तता संबंधित विभागाने दोन आठवड्यांत करावी तसेच तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीसाठी शासनस्तरावर मार्गदर्शन घेण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले.
समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वयक समिती व जिल्हास्तरीय तृतीयपंथीय समस्या निवारण समितीच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, तसेच सामाजिक कार्यकर्ते पल्लवी माने व महेश्वरी लोहार उपस्थित होते.
बैठकीत सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत प्राप्त 29,530 अर्जांपैकी 21,150 अर्ज पात्र ठरले असून, आतापर्यंत 6,991 ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच ‘आई-वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण अधिनियम 2010’ अंतर्गत प्राप्त 28 प्रकरणांपैकी 25 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, उर्वरित तीन प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच तृतीयपंथीयांना रेशनकार्ड, आधारकार्ड, आयुष्मान कार्ड देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे सांगितले. त्याचबरोबर, त्यांनी स्थापन केलेल्या बचतगटांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले.















