सोलापूर जिल्ह्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारीचा लाभ रखडला!
चारचाकी वाहन पडताळणी अपूर्ण; ११ लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा न होण्याची स्थिती
सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या जिल्ह्यातील ११ लाख सहा हजार महिलांना फेब्रुवारी महिन्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही. कारण, महिला व बालकल्याण विभागाने पाठवलेल्या साडेबारा हजार महिलांच्या यादीतील चारचाकी वाहन पडताळणी प्रक्रिया अपूर्ण असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात निधी वर्ग होण्यास विलंब होत आहे.
पडताळणीमुळे लाभ रखडला
सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज केले होते, तर साडेसहा लाख महिलांनी संकेतस्थळावर अर्ज नोंदवले होते. सुरुवातीला १ जुलैपासून लाभ मिळण्यास सुरुवात झाली. मात्र, आता विधानसभेनंतरच्या नव्या निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू झाल्याने अनेकांच्या झोपेचे खोबरे झाले आहे.
योजना अनुसार, दर १५ तारखेला लाभ मिळणे अपेक्षित असते, पण फेब्रुवारी महिना संपूनही अद्याप रक्कम जमा न झाल्याने महिला नाराज आहेत. प्रशासनाने मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित देण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत चारचाकी वाहनधारक लाभार्थींची पडताळणी पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
५२ महिलांनी स्वेच्छेने लाभ नाकारला
पडताळणी सुरू होताच सोलापूर जिल्ह्यातील ५२ महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केली आहे. नोकरी लागली, पतीच्या उत्पन्नात वाढ झाली किंवा अन्य कारणांमुळे त्यांनी ही मागणी केली. काहींनी कोणतेही कारण न देता लाभ थांबवण्याची विनंती केली आहे.
चारचाकी वाहन पडताळणी अंतिम टप्प्यात
महिलांकडे चारचाकी वाहने असल्यास योजना लाभ नाकारला जाईल. सध्या जिल्ह्यातील संबंधित महिलांची तपासणी सुरू असून, त्याचा अहवाल लवकरच विभागाकडे पाठवला जाईल. आतापर्यंत ५० महिलांनी स्वतःहून योजना सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
– रमेश काटकर, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, सोलापूर
➡ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांमुळे हजारो महिलांच्या लाभावर परिणाम होणार का? पडताळणी प्रक्रिया पारदर्शक होईल का? याकडे सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.