मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेचा निकाल जाहीर: स्मिता कांबळे प्रथम
रत्नागिरी – पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जानेवारी ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत ८२ प्रशिक्षणार्थींपैकी ६२ जण उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ७५.६०% आहे.
या परीक्षेत श्रीम. स्मिता अशोक कांबळे यांनी प्रथम क्रमांक, श्रीम. गौरी सतीश भटसाळसकर यांनी द्वितीय क्रमांक, तर श्रीम. अंजली अमित नागविसकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
प्रशिक्षण वर्गासाठी पुराभिलेख संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक संचालक श्री. महेश पाटील (मुंबई), श्री. सर्जेराव वाडकर (कोल्हापूर पुरालेखागार), श्री. लक्ष्मण भिसे (पुणे पुरालेखागार) आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करताना मोडी लिपीच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “मोडी लिपी हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रशिक्षणामुळे फक्त लिपी वाचनाचे कौशल्य विकसित होणार नाही, तर रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील.”
इतिहास विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत **यापुढेही असे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचा मानस** प्राचार्य साखळकर यांनी व्यक्त केला.