मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४`
*

!!*
हे महागणपतेश्वरा…*”दहा दिवसाच्या परममंगल सहवासानंतर, हे सूर्यकोटीसमप्रभा, तुला निरोप द्यायचा आहे. आज तुझ्या मूर्तीचं विसुर्जन पाण्यात होणार आहे. डोळ्यात पाणी उभं आहे.
*हे अमृतमय अनंता,* किती वेडा मी! आदिरूपाला अंत नसतो, तो अनंत असतो, हे म्हणत म्हणत, दु:खी होण्याचं दु:ख मी कशाला डोळ्यावाटे पाझरतो आहे? ‘विसर्जन’ म्हणजे ‘विशेष सर्जन’. तुझी मंगलमूर्ती आज डोळ्यापुढून जाईल, पण ह्रदयातून कशी जाईल? तिचं नव्यानं सर्जन होईल. विशेष सर्जन होईल.
*हे विशालोदर वक्रतुंडा!* तुझ्या विसर्जन दिवसाला वाकडं तोंड करण्याचे मला कारण काय? तुझं वाकडं तोंड झालं आहे, हे निश्चयमूर्तीचं प्रतीक कसं दिसावं, त्यांचा आदर्श म्हणून. मान तुटेल, पण तुटणार नाही, असा निश्चयाचं तुझं वंदनीय प्रतीक.
*हे मोरेश्वरा!* मोरासारख्या सौंदर्यमूर्तीनं तुला ईश्वरत्व दिलं, मूषकासारख्या पिटुकल्या जीवाला तुझ्या विशालोदर देहाला आसनासाठी वाहनरूप होताना चिंता वाटली नाही. भक्तीचा भार निष्ठेनं घेणार्यांची चिंता तू वाहतोस, हे उंदरासारख्या क्षुद्र प्राण्यालाही माहीत आहे. मी त्यात मागे कसा राहीन?
*हे उपकारेश्वर एकदंता!* दुष्टाच्या शासनासाठी स्वत:चा एक दातसुद्धा तू तोडून दिलास. अनेक असूरांची पापं रक्तात बुडवण्याच्या सवयीनंच तुला रक्तवर्ण प्रिय राहिला. “निर्भय मनानं रक्त पाहण्याची सवय राखणारं राष्ट्र आणि त्यातले गण महान होतात.” हा तुझा संदेश अनंतकाळासाठी आहे. आज त्याची पुन्हा आठवण काढतो.
*हे मूलाधार गणराया!* तुझा जन्म दहा दिवसापूर्वी साजरा केला. ते जसं प्रतीक, तसंच आज तुझा विसर्जन दिन आहे, हेही प्रतीकच आहे. ‘येण्यानं सुख, जाण्यानं दु:ख’, हा दुबळेपणा मी लावून घेतला आहे, तू मला चिकटवला नाहीस. हे समजतं; पण हे उमानंदना, उमजत मात्र नाही.
*हे महाकाय महामंडलेश्वरा!* आज तुझी मूर्ती विसर्जित होवो. पण तुझ्या त्रिगुणातीत गुणांचं सर्जन माझ्या चेतनाच्या कणाकणात स्पंदित राहो. तुझी मृत्तिकाकार मूर्ती, मी आपोदेवतेत बोळवणार आहे. पण ‘पुढल्या वर्षी लवकर या’ म्हणत, बोळवणार आहे. म्हणून माझे ‘बोळवणे’, म्हणजे ‘बोलवणे.’
*हे अंताचा अंत करणार्या अनंतेश्वरा!* तुझ्या कर्तव्यकराल अलंकाराचा आदर्श सुवर्णस्पर्श, पुढल्या वर्षाधारेपर्यंत मी मनात आणि वर्तनात वागवीन. पुन्हा एकदा आषाढाचा पहिला दिवस, कालीदासाचे कूजित घेऊन येईल. आणखी एकदा श्रावणधारा सस्यशामलेला शहारतील. पुन्हा एकदा भाद्रपदाचे आकाश, विश्वाच्या अष्टदिशातून तुझ्या आगमनाची मंगल साद देईल. आणि मग निळ्या नभांच्या नीलसमुद्रावर, चंद्राच्या विमानात बसून, इंद्रधनुष्याचे शेले पेहेरून, तू गणसेवेच्या मखरामध्ये मुखर होण्यासाठी पुन्हा आरूढ होशील. त्या दिवसाची आर्तता सांभाळत, आज तुला निरोप. आणि त्या निमित्तानं आजवरच्या अनिश्चिततेला व कर्तव्यच्युतीलाही निरोप!
*— स्वामी विज्ञानानंद*
credit – मनशक्ती ग्रंथ ‘धर्मसंगती’ मधून