घरकूल योजनेतील निधीत ५० हजारांची वाढ – लाभार्थ्यांना दिलासा!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घरकूल योजनेतील निधीत ५० हजारांची वाढ – लाभार्थ्यांना दिलासा!

मुंबई :- राज्यातील नागरिकांसाठी स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना घरकूल योजनेतील निधीत ५०,००० रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. ‘सर्वांसाठी घरे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घरकूल लाभार्थ्यांना मोठा फायदा..

सध्या राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, मोदी आवास, धर्मवीर आनंद दिघे घरकुल आदी योजनांतर्गत घरकुल मंजूर केली जात आहेत. आतापर्यंत ४४ लाख ७ हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी व लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारने घरकूल अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सौरऊर्जा प्रकल्पांचा समावेश

याशिवाय, घरकुल योजनेतील सर्व घरांच्या छतांवर सौरऊर्जा संच बसवले जाणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. यामुळे वीज बिलाचा बोजा कमी होणार असून, पर्यावरणपूरक वीज निर्मितीलाही चालना मिळणार आहे.

राज्यात परकीय गुंतवणुकीला गती

अर्थसंकल्पात औद्योगिक गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आले असून, राज्यात ४० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे ५० लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच, महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येणार असून, सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारण्यात येणार आहेत.

वीज दर होणार स्वस्त?

राज्यातील वीज खरेदीत येत्या पाच वर्षांत १.५ लाख कोटी रुपयांची बचत करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात वीज दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी ५०० कोटींची तरतूद

पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करताना गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागातील दळणवळण सुलभ होणार आहे.

नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच

राज्यातील सर्व नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. घरकूल योजनेसह विविध गृहयोजनांमध्ये सुधारणा करून सर्वसामान्य जनतेसाठी परवडणाऱ्या घरांची संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे घरकूल योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, घराचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]