उमद्या तरुणाचा अकस्मात मृत्यू – होळी गाव शोकसागरात बुडाले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

उमद्या तरुणाचा अकस्मात मृत्यू – होळी गाव शोकसागरात बुडाले

✍️राजापूर/ प्रतिनिधी.

राजापुर -होळीचा सण म्हणजे कोकणवासियांच्या आनंदाचा उत्सव. चाकरमानी, गावकरी, लहानथोर सारेच या सणासाठी मनसोक्त गावी परततात, एकत्र येतात, आनंद साजरा करतात. मात्र याच आनंदावर यंदा काळाने घाला घातला.राजापूर तालुक्यातील जैतापूर नजिकच्या होळी गावातील उमदा तरुण, हसरा-खेळता, साऱ्यांचा लाडका रुपेश गुरव मुंबईला परतताना काळाच्या क्रूर विळख्यात अडकला आणि संपूर्ण गावाला अश्रूंमध्ये भिजवून गेला.

 

▪️ रुपेश आणि त्याचे काही मित्र मुंबईला जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. गर्दी अधिक असल्याने सुपरफास्ट गाडीत चढण्यासाठी धडपड सुरू होती. गाडी स्थानकात शिरताच सर्वत्र गोंधळ उडाला. प्रत्येक जण चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच क्षणी रुपेशनेही गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, मात्र नशीब सोबत नव्हते… त्याचा हात निसटला, तोल गेला आणि तो रेल्वेखाली गेला. एका क्षणात सगळं काळवंडून गेलं. गाडी थांबली. मित्रांनी जीवाच्या आकांताने ओरडत त्याला सावरायचा प्रयत्न केला, पण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुपेशला पाहून साऱ्यांचे हातपाय थरथर कापू लागले.

 

▪️ तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वचजण प्रार्थना करत होते, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते… पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. हसतमुख रुपेशने अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण गावच पोरकं झालं.

 

▪️ हा दुर्दैवी प्रकार गावात वार्‍यासारखा पसरला. घराघरांत हंबरडा उठला. रुपेशच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळलं. आई-वडिलांचा आधार हरपला, भावंडांचे हक्काचे छत्र हरवले. गावातलं प्रत्येक घर सुन्न झालं. होळीच्या रंगावर शोककळा पसरली.

 

▪️ आज होळी गावात फक्त अश्रू वाहत आहेत… न बोलताही प्रत्येक जण एकमेकाच्या वेदना समजू शकतो. रुपेशच्या आठवणींचे क्षण डोळ्यांसमोर तरळत आहेत. एका उमद्या तरुणाच्या अचानक जाण्याने संपूर्ण जैतापूर-होळी परिसर शोकसागरात बुडाला आहे.

राजु सागवेकर बातमीदार..

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]