रत्नागिरी नगरपालिकेत ४ कोटींचा शौचालय घोटाळा उघडकीस

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी नगरपालिकेत ४ कोटींचा शौचालय घोटाळा उघडकीस

बोगस दुरुस्ती कामांचे बिले काढून कोट्यवधींची उधळपट्टी; प्रशासक राजवटीतील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

बातमी : सविस्तर

रत्नागिरी : आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या रत्नागिरी नगरपालिकेत तब्बल ४ कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा समोर आल्याने शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेवर ६५ कोटी रुपयांचे कर्ज असताना हा घोटाळा उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तथा भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी नगरपालिकेतील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावाखाली झालेला हा कथित भ्रष्टाचार उघड केला आहे.

 

“कर्मचाऱ्यांनी बोगस कामे दाखवून कोट्यवधी रुपये लाटले आणि त्याचा भार मात्र कररूपाने सामान्य नागरिकांवर टाकला जात आहे,” असा गंभीर आरोप तिवरेकर यांनी केला आहे.

 

रत्नागिरी शहरात एकूण ८० सार्वजनिक शौचालये असून, गेल्या चार वर्षांत म्हणजेच लोकप्रतिनिधी नसलेल्या प्रशासक राजवटीत या शौचालयांच्या दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

कागदपत्रांची तपासणी करताना धक्कादायक बाबी समोर आल्या असून, १ हजार रुपयांची वस्तू ५ हजार रुपये दाखवून बिले काढण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर एकाच शौचालयाच्या दुरुस्तीसाठी दोन ते तीन वेळा खर्च दाखवून पैसे लाटण्यात आले असल्याचे समोर आले आहे. ही सर्व बिले मंजूर होऊन संबंधितांना पैसेही अदा करण्यात आले आहेत.

 

विशेष म्हणजे, कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च दाखवला असला तरी आज शहरातील बहुतांश शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचाही अभाव असून, प्रत्यक्षात काम झालेच नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

एकीकडे हा कथित भ्रष्टाचार सुरू असताना दुसरीकडे नगरपालिकेची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. समीर तिवरेकर यांनी सांगितले की,

“आज नगरपालिकेच्या खात्यात अवघे १२ लाख रुपये शिल्लक आहेत, तर कंत्राटदार व इतर देणी मिळून ६५ कोटी रुपयांचा बोजा पालिकेवर आहे.”

 

या आर्थिक उधळपट्टीचा फटका आता थेट रत्नागिरीतील सामान्य नागरिकांना बसणार असून, करवाढीच्या माध्यमातून हा भार जनतेवर टाकला जाण्याची शक्यता आहे.

 

प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप करत तिवरेकर म्हणाले,

“माझा उद्देश रत्नागिरीचा विकास आहे. या घोटाळ्याशी संबंधित सर्व निविदा, बिले आणि कागदपत्रे मी गोळा करत असून, प्रत्येक शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रकार शेवटपर्यंत नेणार आहे.”

 

या प्रकरणामुळे नगरपालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अडचणीत येण्याची दाट शक्यता असून, पुढील काळात कोणती चौकशी आणि कारवाई होते, याकडे संपूर्ण रत्नागिरी शहराचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]