सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे यु.एन.डी.पी. सोबत
‘शोभिवंत मत्स्यपालन’ प्रशिक्षण आयोजित
रत्नागिरी, दि. २५ ऑगस्ट २०२६:
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत, झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे ‘शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन’ या विषयावर दिलासा जनविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणाचा उद्देश होतकरू शेतकरी व मत्स्य व्यवसायाशी संबंधित इच्छुकांना शोभिवंत मत्स्यपालन व मत्स्यालय व्यवस्थापनातील आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक संधी आणि प्रकल्प उभारणीविषयी मार्गदर्शन करणे हा होता.
प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी शोभिवंत मत्स्यपालनाची सद्यस्थिती, शोभिवंत माशांची ओळख व जीवनचक्र, मत्स्यालय टाकीची बांधणी व विविध प्रकार, पाणी व्यवस्थापन, पिल्लेघालणाऱ्या व अंडी घालणाऱ्या माशांचे प्रजनन व पालन, शोभिवंत मत्स्य प्रकल्पाचे बांधकाम तसेच प्रकल्पाचे अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी शोभिवंत मत्स्यपालनातील रोग व व्यवस्थापन, कृत्रिम व जिवंत खाद्याचे प्रकार व तयार करण्याच्या पद्धती, सागरी शोभिवंत मासे, शोभिवंत माशांची काढणी व वाहतूक, शोभिवंत पाणवनस्पतींची ओळख तसेच मत्स्यालयातील विविध उपकरणे व साहित्य यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणाच्या शेवटी तांत्रिक चर्चासत्र, परीक्षा, निरोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या समारोप कार्यक्रमास डॉ. केतनकुमार चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी, श्री रोहित सावंत, जिल्हा समन्वय सहयोगी, GCF ECRICC प्रकल्प सिंधुदुर्ग, श्री. सुरज गगनग्रास, दिलासा जनविकास प्रतिष्टान हे उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणाचा अनुभव मांडताना, श्री. हिमांशू कदम, कांदळगाव, ता.मालवण आणि सौ. श्रुती जाधव, मालवण यांनी या प्रशिक्षणामुळे सहभागी होतकरू शेतकऱ्यांना शोभिवंत मत्स्यपालन व मत्स्यालय व्यवस्थापन क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या विविध संधींबाबत व्यावहारिक माहिती मिळाली, तसेच मत्स्य व्यवसायाच्या विविध क्षेत्रांत नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान प्राप्त झाले असे सांगितले. श्री. रोहित सावंत यांनी सदर कार्यक्रम मध्ये प्रात्यक्षिकांचा भर असल्याने, सदर प्रशिक्षणाचा नक्कीच प्रशिक्षानार्थीना उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. केतनकुमार चौधरी, उपस्थित मत्स्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शोभिवंत मत्स्यपालकांना या क्षेत्रातील तंत्रज्ञान, प्रशिक्षण व शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच कोकण कृषि विद्यापीठ नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी शेतकरी, मत्स्य उद्योजक व विद्यार्थ्यांनी तज्ञांशी चर्चासत्र साधून विविध शंकांचे निरसन करून घेतले. उपस्थितांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपूर्वा सावंत यांनी केले, तर प्रा. सचिन साटम यांनी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ, शेतकरी, विद्यार्थी आणि आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सदर कार्यक्रम आयोजन करिता जि.सी.एफ.-ई.सी.आर.आय.सी.सी., यु.एन.डी.पी. प्रकल्प अंतर्गत वन विभाग (कांदळवन), मालवण, जि. सिंधुदुर्ग यांनी या कार्यक्रमाकरिता खर्च प्रायोजित केला. सदर कार्यक्रम आयोजन करिता श्रीम. कांचन पवार (आय.एफ.एस.), विभागीय वनअधिकारी; श्री. महादेव शिंगाडे, वन परिक्षेत्र अधिकारी, मालवण; श्री. विक्रम यादव, राज्य प्रकल्प व्यवस्थापक, GCF ECRICC प्रकल्प, महाराष्ट्र आणि दिलासा जनविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. संजयकुमार तोरणे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर, डॉ. मनोज घुघुसकर, डॉ. हरिष धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, श्रीम. वर्षा सदावर्ते व श्रीम. अपूर्वा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.









