होळी उत्साहात; नमाजही शांततेत पार पडला!
देशभर होळी चा रंगबेरंगी उत्सव
नवी दिल्ली: रंगांचा सण होळी देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. लोकांनी एकमेकांवर गुलाल उधळून सणाच्या शुभेच्छा दिल्या. पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत रस्त्यांवर आणि घरोघरी रंगीबेरंगी उत्सवाचे दृश्य पाहायला मिळाले.
महानगरांमध्ये सकाळी सार्वजनिक वाहतूक सेवा बंद होती, तर काही ठिकाणी दुपारनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. रमजानच्या दुसऱ्या शुक्रवारच्या नमाज आणि होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने देशभर कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली होती.
संभलमध्ये उत्सव शांततेत पार पडला
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये काही महिन्यांपूर्वी उसळलेल्या तणावानंतर प्रशासनाने खबरदारी घेतली होती. शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणानंतर नोव्हेंबरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे येथे विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे दोन्ही सण शांततेत पार पडले. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मस्जिदीत नमाज पठण करण्यात आले, तर परंपरागत ‘चौपई मिरवणूक’ही निकालण्यात आली.
योगी आदित्यनाथांकडून होलिका पूजन
गोरखपूर: उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाधीश योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने होलिका भस्माची पूजा करून होळी साजरी केली. गोरखनाथ मठात मोठ्या भक्तगणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
दिल्लीतील सुरक्षेसाठी २५,००० पोलीस तैनात
नवी दिल्ली: होळी आणि रमजानच्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दिल्ली पोलिसांचे २५,००० हून अधिक जवान तैनात होते, तर ३०० संवेदनशील भागांवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवण्यात आली होती.
संभलमध्ये नमाजाच्या वेळेत बदल
होळीच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर असल्याने संभलच्या शाही जामा मशिदीतील नमाजाची वेळ बदलण्यात आली. उलेमांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नमाज शांततेत पार पडला.
सण साजरा करताना एकोपा जपला!
होळी आणि रमजानच्या नमाजामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाला सुरक्षेची जबाबदारी अधिक भासली. मात्र, देशभरात सणाचा उत्साह कायम राहिला आणि धार्मिक सलोखा जपला गेला, हे विशेष!