रत्नागिरीत १०० दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न
रत्नागिरी: शासनाच्या १०० दिवस कृती आराखड्याच्या कार्यक्रमात सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी प्रभावी सहभाग दिसून येत आहे. प्रलंबित प्रस्तावांचा गतीने पाठपुरावा करावा, असे निर्देश पालक सचिव तथा अप्पर मुख्य सचिव (साप्रवि) सीमा व्यास यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १०० दिवस कृती आराखड्याच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर पालक सचिव सीमा व्यास यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “जलजीवन मिशन आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा त्वरीत करावा. नवीन कामे सुरू करण्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच यासंदर्भात आठवडाभरात अहवाल सादर करावा.”
यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विविध कामांचा आढावा सादर केला. तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) हर्षलता गेडाम यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबाबत आणि कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांनी जलजीवन मिशनबाबत सादरीकरण केले.
लांजा तहसील कार्यालय आणि प्रकल्प स्थळांना भेट
बैठकीनंतर पालक सचिव सीमा व्यास यांनी लांजा तहसील कार्यालय आणि आसगे गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत बांधलेला गोठा, शेततळे आणि जलजीवन मिशनमधील जलकुंभ यांची पाहणी केली. या दौर्यात सहायक जिल्हाधिकारी डॉ. जॅस्मिन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, तहसीलदार प्रियांका ढोले, सरपंच अनुष्का गुरव आदी उपस्थित होते.
– निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आभार मानत बैठक संपन्न झाली.